मलकापुरातील भोंदू महाराजावर गुन्हा
By Admin | Published: June 12, 2014 11:48 PM2014-06-12T23:48:12+5:302014-06-13T00:35:40+5:30
येरमाळा : मलकापूर (ताक़ळंब) येथील एकनाथ सुभाष लोमटे या भोंदू महाराजाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
येरमाळा : अंधश्रध्देला खतपाणी घालून भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या मलकापूर (ताक़ळंब) येथील एकनाथ सुभाष लोमटे या भोंदू महाराजाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, जिल्ह्यात प्रथमच एका महाराजाविरूध्द जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, यामुळे भोंदू महाराजांचे धाबे दणाणले आहेत़
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलकापूर येथील एकनाथ महाराज लोमटे यांच्याविरूध्द १८ मार्च २०१४ रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील-खंडापूरकर, शिवाजी गिड्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती़ तक्रारीत महाराज हा कुठल्याही रोगावर खात्रीशीर उपचार म्हणून जडीबुटी, बुक्का, लिंबू-नारळ, बिबा, मिरची अशा वस्तू देऊन पैसे घेत भोंदूगिरी करून नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचे म्हटले होते़ यानंतर जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च रोजीच चौकशीसाठी एक समिती गठीत केली होती़ यावरून समिती अध्यक्षा तथा तहसीलदार वैशाली पाटील व इतर सदस्यांनी १२ जून रोजी प्रत्यक्ष मलकापूर येथे जाऊन पाहणी केली़ त्यावेळी ‘मलकापूरचा महिमा’ या पुस्तकात अंधश्रध्देला बळी पडणारे विधाने, एका जागी असताना दोन ठिकाणी असलेली विधाने, पुत्रप्राप्ती, असाध्य रोग दुरूस्त करतो, असे खोटे बोलून भाविकांची आर्थिक लूट करीत अंधश्रध्देला खतपाणी घालणारे असल्याचे समोर आले.
यावरून मंडळ अधिकारी भारत एकनाथ ओव्हाळ यांनी गुरूवारी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर याप्रकरणी एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्याविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ठ जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
दरम्यान, भ्रष्टाचार निर्मूलन समितीने अंधश्रध्देच्या विरोधात जे आंदोलन उभा केले होते़ त्यात प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील-खंडापूरकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गिड्डे यांनी २३ मे रोजी कळंब तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले होते़ या आंदोलनाची गंभिर दखल घेत त्यानंतर प्रशासनाने पुढील हालचाली केल्या़
(वार्ताहर)