बॅटको ट्रान्स्पोर्टवर गुन्हे शाखेची धाड ; २५ लाखांचा गुटखा जप्त
By | Published: November 28, 2020 04:05 AM2020-11-28T04:05:19+5:302020-11-28T04:05:19+5:30
ट्रान्स्पोर्टचा मॅनेजर हनीफ अब्दुल रहेमान पटणी (४३, रा. टाइम्स कॉलनी) आणि नदीम शेख, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी हनीफ ...
ट्रान्स्पोर्टचा मॅनेजर हनीफ अब्दुल रहेमान पटणी (४३, रा. टाइम्स कॉलनी) आणि नदीम शेख, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी हनीफ यास अटक केली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुन्या मोंढ्यातील बॅटको ट्रान्स्पोर्ट येथे परराज्यातून गुटखा आणल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. त्यावरून सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, कर्मचारी शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, राजेंद्र साळुंके, विरेश बने, विठ्ठल सुरे आणि भावसिंग चव्हाण त्यांच्या पथकाने अन्न भेसळ विभागाचे अधिकारी एम.एम. फाळके, एच.व्ही. कुलकर्णी आणि श्रीराम टापरे यांना सोबत घेऊन गुरुवारी दुपारी बॅटको ट्रान्स्पोर्टवर धाड टाकली. गोदामात पांढऱ्या गोण्यात आणि गोणपाटात लपवून ठेवलेला सुमारे २४ लाख ६० हजार ५४० रुपयांचा गुटखा आढळला. हनीफकडे या मालाविषयी विचारणा केली असता गुरुवारी सकाळी इंदूर येथून नदीम शेख यांच्या मालकीचा सुमारे ९ लाखांचा माल आल्याचे त्याने सांगितले. उर्वरित गुटखा कोणाचा, कोणी मागवला, कुठून आणला याविषयी कोणतीही कागदपत्रे सादर करण्यास त्याने असमर्थता दर्शविली. ट्रान्स्पोर्टने आलेल्या मालाची कागदपत्रे (बिल्टी) ठेवण्याची जबाबदारी त्याची आहे. मात्र, त्याने माहिती देण्यास नकार दिला. आरोपीविरूध्द जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक व्ही.एम. केंद्रे तपास करीत आहेत.
==========
चौकट
शहरात सर्वत्र मिळतो गुटखा
शहरात गुटखा माफिया सक्रिय असून, ते बिनधास्तपणे गुटखा विक्री करतात. शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकातील टपरीवर गुटखा खुलेपणाने विक्री केला जातो. ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्येही हे स्पष्ट झाले होते.