आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाचा ६५ किलोमीटरचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:09 AM2021-09-02T04:09:12+5:302021-09-02T04:09:12+5:30
औरंगाबाद : कार विकत घ्यायची म्हणून ट्रायलसाठी निघालेल्या दोघांनी सोबतच्या कामगाराला चाकूचा धाक दाखवून खाली उतरविले आणि मुंबईच्या दिशेने ...
औरंगाबाद : कार विकत घ्यायची म्हणून ट्रायलसाठी निघालेल्या दोघांनी सोबतच्या कामगाराला चाकूचा धाक दाखवून खाली उतरविले आणि मुंबईच्या दिशेने सुसाट निघाले. ही माहिती समजताच गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ६५ किलोमीटर पाठलाग करीत दोघांना पकडले. १ वाजून २८ मिनिटांनी सुरू झालेला हा थरार ३ वाजून ३२ मिनिटांनी आरोपी पकडल्यानंतर संपला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाबविश्व मंगल कार्यालयाजवळील वैष्णवी जुने कार विक्री दुकानात फैजल रफीक सय्यद (२४, रा. रहेमानिया कॉलनी, गल्ली नंबर ८) व सय्यद अरबाज सय्यद आरेफ (रा. रोशन गेट) हे दोघे बुधवारी दुपारी १ वाजता खरेदी करण्याच्या बहाण्याने गेले. त्यांनी महागडी कारची (क्र. एमएच १५ डीसी ३४८८) ट्रायल मागितली. दुकानातील एक कर्मचारी त्यांच्यासोबत कारमध्ये बसून ट्रायलला निघाले. कार सेव्हनहिल मार्गे चुन्नीलाल पेट्रोलपंप येथे आल्यानंतर दोघांपैकी एकाने कामगाराला चाकूचा धाक दाखवून खाली उतरले. त्यानंतर कार सुसाट निघून गेली. ही माहिती समजताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी विविध पथकांना अलर्ट करीत गाडीचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. गस्तीवरील उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्यासह सहाय्यक फाैजदार नंदकुमार भंडारे, अंमलदार किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर व धर्मराज गायकवाड यांच्या पथकाने १ वाजून २८ मिनिटांनी गंगापूर, नेवासा फाट्याच्या दिशेेने पाठलाग सुरू केला. चोरट्यांनी पळविलेली गाडी एका टोल नाक्यावर ट्रेस झाली. तेथून त्या गाडीच्या मागावर एक जण ठेवण्यात आला. त्याच्याकडून गुगल लोकेशन ट्रेस करण्यात येत होते. चोरटे वैजापूरच्या दिशेने गेल्यानंतर शेळके यांनी गाडी नेवासा फाट्यावरून वैजापूरजवळील पुरणगाव चौफुलीवर आणली. तेवढ्यात चोरट्यांना वैजापूर पोलिसांची गाडी दिसल्यामुळे त्यांनी शिर्डीच्या दिशेने गाडी दामटली. गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा पाठलाग सुरू केला. ट्रकला ओव्हरटेक करताना दोघांनी गाडी रस्त्याच्या खाली खड्ड्यात उतरवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना पकडले.