बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणातील आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्यावर गुन्हे शाखेचा भर
By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:48+5:302020-12-02T04:05:48+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रीडा प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा गत महिन्यात जवाहरनगर ठाण्यात दाखल झाला. या ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रीडा प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा गत महिन्यात जवाहरनगर ठाण्यात दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि कर्मचारी करीत आहेत. न झालेल्या क्रीडा स्पर्धात सहभाग नोंदवून विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याचे क्रीडा प्रमाणपत्र आरोपींनी तयार केले. या प्रमाणपत्रांपैकी काही प्रमाणपत्रांवर तत्कालीन अधिकारी डॉ. नितीन करीर यांच्या आणि संघटनेच्या सचिवांच्या बनावट स्वाक्षऱ्या आहेत. बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणारे एजंट कार्यरत आहेत. या एजंटांमार्फत लाख रुपयांची देवाणघेवाण करून हे प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धात सहभागी झाल्याचे आणि क्रमांक मिळविल्याचे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या १८८ पैकी ४८ बनावट खेळाडूंनी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविला. न्यायालयाने या आरोपींना जामीन देताना त्यांना गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले. यामुळे संशयित आरोपी चार दिवसांपासून गुन्हे शाखेत हजेरी देण्यासाठी गर्दी करीत आहेत. आरोपींची पोलीस अधिकारी कसून चौकशी करीत आहेत. त्यांची हस्ताक्षर नमुने घेण्यात येत असल्याचे सपोनि शिंदे यांनी सांगितले. आरोपींना अटक करण्यापूर्वी त्यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त ठोस पुरावे गोळा करण्यावर आमचे काम सुरू आहे. अटकपूर्व जामीन घेतलेल्या ४८ पैकी १५ आरोपी आतापर्यंत चौकशीकरिता हजर झाले आहेत. त्यांना एक दिवसाआड गुन्हे शाखेत हजेरी देण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याचे त्यांनी नमूद केले.