ईश्वर मंझाविरोधात २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 07:08 PM2018-02-24T19:08:14+5:302018-02-24T19:08:50+5:30
एका तरुणाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी अटकेत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझाने आणखी सहा जणाला नोकरीचे अमिष दाखवून २७ लाख ५० हजार रुपये उकळल्याचे समोर आले.
औरंगाबाद : एका तरुणाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी अटकेत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझाने आणखी सहा जणाला नोकरीचे अमिष दाखवून २७ लाख ५० हजार रुपये उकळल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात मंझाविरोधात आर्थिक गुन्हेशाखेने गुन्हा नोंदविला.
याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हेशाखेच्या अधिका-यांनी सांगितले की, तक्रारदार कल्याण खिरा राठोड(रा. बिडकीन जंगला तांडा,ता.पैठण) हे शेतकरी असून दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर(डीएमआयसी) प्रकल्पासाठी शासनाने त्यांची जमिन संपादीत केल्याने जमिनीचा मोबदला म्हणून त्यांना मोठी रक्कम मिळाली आहे. राठोड यांची मुले दीपक आणि राहुल हे पदवीधर असून ते बेरोजगार आहे. २०१४ साली ते अंबड येथील संपत राठोड या नातेवाईकाच्या घरी गेले असता तेथे त्यांनी मुलांच्या नोकरीचा विषय काढला होता. त्यावेळी संपत यांनी त्याच्या ओळखीच्या ईश्वरसिंग मंझा हा विद्यापीठात मोठ्या पदावर असून त्याने अनेकांना नोकरीला लावल्याचे सांगितले. त्यामुळे काही दिवसाने संपत आणि कल्याण राठोड हे विद्यापीठात जाऊन मंझा यास भेटले. तेव्हा त्याने कल्याण यांच्या मुलांचे शिक्षण आणि सध्या ते काय करतात असे विचारले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात त्यांना क्लार्कपदी लावून घेतो, मात्र त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये लागतील असे सांगितले.
यावेळी कल्याण यांनी त्यांचा जावई ज्ञानेश्वर चव्हाण, बबन चव्हाण, पुतण्या सचिन राठोड, भाचा राजेंद्र चव्हाण यांच्याही नोकरीचे काम करण्याचे सांगितले. त्यावेळी मंझा यांनी सर्वांचे ४८ लाख रुपये लागतील असे सांगून यातील जास्तीत जास्त रक्कम दिल्यास नोकरीची आॅर्डर देता येईल असे तो म्हणाला. त्यावेळी कल्याण यांनी टप्प्या टप्याने पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून आणि त्याच्या बँक खात्यातून सहा जणांच्या नोकरीसाठी अॅडव्हान्स म्हणून १० जून २०१४ रोजी आरोपीच्या विटखेडा येथील घरी ११ लाख रुपये तर १० नोव्हेंबर २०१४ रोजी १६ लाख ५० हजार रुपये नेऊन दिले. तेव्हा दोन महिन्यानंतर नोकरीची आॅर्डर मिळेल असे सांगितले. दोन महिन्यानंतर ते आरोपीला भेटण्यासाठी गेले असता एका प्रकरणात मंझा निलंबित असल्याचे त्यांना समजले.