एमआयएम नगरसेवकासह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:03 PM2018-05-08T13:03:58+5:302018-05-08T13:04:44+5:30
चोरीच्या ट्रकचे चेसिस नंबर बदलून परस्पर दुसऱ्यांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी अटक केलेला एमआयएमच्या नगरसेवकाविरोधात औरंगाबादेतील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.
औरंगाबाद : चोरीच्या ट्रकचे चेसिस नंबर बदलून परस्पर दुसऱ्यांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी अटक केलेला एमआयएमच्या नगरसेवकाविरोधात औरंगाबादेतील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. भाड्याने दिलेल्या दोन ट्रकचे नंबर बदलून परस्पर विक्री केल्याचा आरोप नगरसेवक जफरसह तीन जणांवर ठेवण्यात आला आहे.
नगरसेवक शेख जफर, त्याचा भाऊ शेख बाबर आणि शेख जावेद शेख अब्दुल्ला (सर्व रा. संजयनगर, बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अंबिकानगर येथील रहिवासी रवींद्र शंकर जरारे यांनी त्यांच्या मालकीचे दोन हायवा ट्रक (एमएच-१५सीके ९६९९)आणि ट्रक (एमएच-१८डीए ७५५५)आरोपींना भाडेतत्त्वावर दिले होते. दरमहा २ लाख २० हजार रुपये भाडे जरारे यांना आरोपींकडून मिळणार होते.
ट्रक ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी या दोन्ही ट्रकचा चेसिस नंबर आणि रंग बदलून त्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर आरोपींनी परस्पर अज्ञात व्यक्त ींना विक्री केले. एवढेच नव्हे तर तक्रारदार यांच्या आधारकार्डवर दुसऱ्याच व्यक्तीचे छायाचित्र लावून ना हरकत प्रमाणपत्र तयार करून ट्रक विक्रीच्या कागदपत्रावर बनावट सह्या करून व्यवहार कायदेशीर असल्याचे भासविले. ही घटना ११ जानेवारी २०१७ ते ६ मे दरम्यान चिकलठाणा येथील टाटा बॉडी बिल्डर गॅरेजमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी शेख बाबरला गुन्हेशाखेने काही दिवसांपूर्वी अटक केलेली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून दोन हायवा ट्रक आणि एक कार जप्त केलेली असून, अन्य वाहनांचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. भिवंडी पोलिसांच्या कोठडीत असलेला आरोपी नगरसेवक जफरला लवकरच या गुन्ह्यात हस्तांतरित करून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी जावेदचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.