एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:46 PM2017-11-09T13:46:10+5:302017-11-09T13:54:59+5:30
२०१५ साली महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणुक लढविताना निवडणुक आयोगाला खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांच्याविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद: २०१५ साली महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणुक लढविताना निवडणुक आयोगाला खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांच्याविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.
याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, कादरी यांच्या खोट्या शपथपत्रा प्रकरणी वाहेद अली झाकेर अली हाश्मी (३५,रा. शाहिन बाग,दिलरस कॉलनी) यांनी सिटीचौक पोलिसांना तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, २०१५ मध्ये महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणुक झाली. या निवडणुकीत कादरी यांनी आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी वॉर्ड क्रमांक १९ मधून एमआयएम पक्षाकडून निवडणुक लढविली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यावेळी कादरी यांनी निवडणुक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मकसुद कॉलनी येथील १३९४ चौ.मी.च्या भूखंडाची माहिती जाणीवपूर्वक लपविली. हा भूखंड त्यांच्या नावे असूनही त्यांनी निवडणुक आयोगाची आणि जनतेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने शपथपत्रात या संपत्तीचा उल्लेख केला नाही. यानुसार जनता आणि शासनाची दिशाभूल करून जमीर अहेमद कादरी यांनी नगरसेवक पद मिळविल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक कादरीविरूद्ध फसवणुक करणे, बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासविण्याचा गुन्हा नोंदविला. सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिष खटावकर हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.