मायभूमीत परका ठरलेल्या कारागिरावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:04 AM2021-03-29T04:04:16+5:302021-03-29T04:04:16+5:30
औरंगाबाद : जन्मदात्या आई-वडिलांनी नाकारले म्हणून तो येमेन देशातून वाळूजजवळील शेंदूरवाद्यात आपल्या आजोबाकडे आला; पण इथेही नशिबाने त्याला साथ ...
औरंगाबाद : जन्मदात्या आई-वडिलांनी नाकारले म्हणून तो येमेन देशातून वाळूजजवळील शेंदूरवाद्यात आपल्या आजोबाकडे आला; पण इथेही नशिबाने त्याला साथ दिली नाही. व्हिसाची मुदत संपुष्टात आल्यानंतरही तो भारतातच राहिला. एवढेच नव्हे, तर त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र काढून शासनाची फसवणूक केली म्हणून सातारा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अली मोहम्मद अवद बीन हलाबी (रा. अब्रार कॉलनी, सातारा परिसर) असे त्या युवकाचे नाव आहे. अली मोहम्मद हा सन २०१२ मध्ये
भारतात शेंदूरवादा येथे टुरिस्ट व्हिसावर आला होता. येथे त्याच्या आजोबा, मामा आणि आत्याने त्याचे पालनपोषण केले. शेंदूरवाद्याला त्याच्या आजोबाचे (आईचे वडील) घर, शेती आहे. त्याचे वडीलही औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी होते. त्याचे आजोबा (वडिलाचे वडील) आपल्या कुटुंबासह नोकरीनिमत्त येमेन येथे गेले, तेथेच स्थायिक झाले. त्याच्या वडिलांनी शेंदूरवादा येथील नातेवाइकाच्या मुलीसोबत विवाह करून तेही येमेनमध्येच स्थायिक झाले.
अली मोहम्मद याचा जन्म येमेनमध्येच झाला. त्यामुळे नागरिकत्वही त्याला त्याच देशाचेच मिळाले. काही दिवसांनंतर त्याचे आई-वडील तेथे विभक्त झाले. त्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी दोघांनीही हात वर केले आणि तो थेट औरंगाबादेत आला. येथे कधी शेंदूरवाद्याला आजोबाकडे, तर कधी शहरात आत्याकडे राहायचा. येथे आल्यानंतर काही दिवसांनी तो बीड बायपास परिसरात गॅरेजवर काम करू लागला. त्याने येथे लग्नही केले. सातारा परिसरातील अब्रार कॉलनीत तो आत्याकडे राहायचा. दरम्यानच्या काळात त्याने निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड काढले व तो स्वत:ला आता भारतीय नागरिकच समजत होता; पण जेव्हा सातारा पोलिसांना ही कुणकुण लागली तेव्हा त्याचे धाबेच दणाणले. पोलिसांनी त्याच्यावर व्हिसा संपुष्टात आल्यानंतरही अवैधरीत्या भारतात राहणे तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व पॅन कार्ड काढून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला असून, सातारा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे जन्मदात्यांनी नाकारले, तर दुसरीकडे आता तो मायभूमीतही परकाच ठरला. याप्रकरणी उपनिरीक्षक दासरे तपास करीत आहेत.