लाथाबुक्यांनी मारहाण केल्यानंतर फरफटत ओढत आणून युवकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 10:29 PM2022-09-29T22:29:27+5:302022-09-29T22:31:37+5:30
राम शिनगारे औरंगाबाद - रस्त्याने घराकडे जात असलेल्या युवकास 'तू जास्त शहाणा झाला काय, मला पिपाणी वाजवू नको का ...
राम शिनगारे
औरंगाबाद - रस्त्याने घराकडे जात असलेल्या युवकास 'तू जास्त शहाणा झाला काय, मला पिपाणी वाजवू नको का म्हणाला', असे म्हणून तीन जणांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर गल्लीतुन फरफटत नेत डांबरी रस्त्यावर आणले. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी सातारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
श्रीकांत बाबासाहेब मोतीचुर (१८, रा. प्रतिज्ञानगर, ईटखेडा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांसह आकाश उर्फ आदित्य सुनील बादाडे (२१, रा. ईटखेडा) याचा समावेश आहे. मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार १५ वर्षाचा एक अल्पवयीन मुलगा यात्रेतून आणलेली पिपाणी वाजवत होता. तेव्हा त्यास श्रीकांतने पिपाणी वाजवू नको, असे सांगितले. तेव्हा त्याने श्रीकांतला शिवीगाळ करीत बघुन घेण्याची धमकी दिली. त्यानंतर श्रीकांत त्याच्या मित्रासोबत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना दोन अल्पवयीन मुलांसह आरोपी आकाश याने त्यास अडवले.
'तू जास्त शहाणा झाला काय, मला पिपाणी वाजवू नको का म्हणाला होता', असे म्हणत श्रीकांतला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला खालीपाडून तुडविण्यात आले. त्यानंतर तिघांनी त्यास गल्लीतून फरफटत ओढत डांबरी रस्त्यावर आणले. त्याठिकाणीही मारहाण केली. त्या तिघांच्या तावडीतून इतरांनी सुटका करीत गंभीर जखमी श्रीकांतला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून उपचारासाठी घाटीत पाठवले. त्याठिकाणी तपासून मृत घोषित केले. २७ सप्टेंबरच्या रात्री मृत घोषित केल्यानंतर श्रीकांतवर २८ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी त्याच्या आईने सातारा ठाण्यात येत तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला.
एकास अटक, दोन बालसुधारगृहात
श्रीकांतचा खून करणाऱ्या तिघांपैकी दोघा अल्पवयीन युवकास सातारा पोलिसांनी ताब्यात घेत बाल न्याय मंडळासमोर उपस्थित केले. त्याठिकाणाहून दोघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. तर आकाश उर्फ आदित्य बादाडे यास अटक करीत न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. अधिक तपास सहायक निरीक्षक सुनील कराळे करीत आहेत.