नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिली तक्रार
By राम शिनगारे | Published: June 23, 2023 10:01 PM2023-06-23T22:01:06+5:302023-06-23T22:01:15+5:30
जुगार अड्डे बंद करण्यासाठी केले आंदोलन
छत्रपती संभाजीनगर :पोलिस आयुक्तालयाच्या समोर नग्न आंदोलन करणाऱ्या एकजणाच्या विरोधात उपस्थित महिला पोलिस कर्मचाऱ्याने मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्यामुळे विनयभंगाची तक्रार दिली. त्यानुसार बेगमपुरा पोलिस ठाण्यात आंदोलनकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
रमेश विनायक पाटील (रा. गुलमंडी, दलालवाडी) असे आरोपी आंदोलनकर्त्याचे नाव आहे.
रमेश पाटील यांनी शहरात सोशल क्लबच्या नावाखाली अनेक जुगार अड्डे सुरू आहेत. हे जुगार अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी पोलिस आयुक्तालयासमोर नग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आयुक्तालयाच्या समोर तगडा बंदोबस्त तैनात केला होता. महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील हे एका दुचाकीवर पाठीमागे अंगावर शॉल पांघरून बसले होते.
दुचाकीवरून उतरताच त्यांनी अंगावरील शॉल काढुन घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा त्यांच्या अंगावर फक्त छोटी निकर होती. अशा अवस्थेत उभे राहुन प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करीत होते. सार्वजनिक ठिकाणी महिलांना लज्जा निर्माण होईल, असे त्यांचे हावभाव होते. त्यामुळे माझ्यासह बंदोबस्तावरील महिला अधिकारी व अंमलदारांच्या मनास या प्रकारामुळे लज्जा वाटुन आमचा विनयभंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पाटीलच्या विरोधात बेगमपुऱ्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
बायको हवी म्हणून लावले होते बॅनर
रमेश पाटील हे हटके आंदोलन करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी शहरात महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको हवी असल्याचे बॅनर लावले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय रमेश पाटील हे कायम वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करीत असतात.