मोठी कारवाई! अब्दुल सत्तार, गफार कादरी यांच्याशी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:55 AM2024-11-09T11:55:26+5:302024-11-09T12:02:06+5:30
संस्थाचालक अन् निवडणूक आयोगाच्या कात्रीत सापडले शिक्षक
- राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची माहिती वेळेत ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबियांशी संबंधित शिक्षण संस्थेच्या २५ शाळांच्या मुख्याध्यापक आणि औरंगाबाद पूर्व विधानसभेतील सपाचे उमेदवार डॉ. गफार कादरी यांच्या संस्थेतील तीन शाळांच्या दोन मुख्याध्यापकांवर विविध पोलिस ठाण्यांत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी गुन्हे नोंदवले आहेत. यामुळे शिक्षण संस्थांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आता संस्थाचालक आणि निवडणूक आयोगाच्या कात्रीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्य शासनाकडून अनुदान घेणाऱ्या शाळांनी निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, म्हणून निवडणूक आयोगाने सर्व आस्थापनांकडून ऑनलाइन पोर्टलवर कर्मचारी आणि शिक्षकांची नावे मागवली होती. जिल्ह्यातील ९० शाळांनी ही माहिती भरली नाही. त्यामुळे वारंवार नोटीस, सूचना दिल्यानंतर ४१ शाळांनी माहिती अपलोड केली. त्यानंतर उर्वरित ४९ शाळांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश निवडणूक विभागाने प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन २८ शाळांच्या २७ मुख्याध्यापकांवर गुन्हे नोंदवले आहेत. त्यात सिल्लोड, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद आदी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान, गुन्हे दाखल झालेल्या शाळांमधील तब्बल २५ शाळा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थांशी संबंधित आहेत. शाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते निवडणूक आयोगाकडे माहिती अपलोड करण्यास तयार होते. मात्र, संबंधितांना माहिती अपलोड करू नये, म्हणून संस्थाचालकांनीच सूचना केल्या. त्यामुळे आता गुन्हे दाखल होऊन नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही मुख्याध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
शिक्षकांचा निवडणुकीच्या प्रचारात वापर
राजकीय आखाड्यात असलेले संस्थाचालक शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारात वापरतात. या शिक्षकांकडे प्रत्येक गावासह बुथचे नियोजन देण्यात आलेले आहे. तसेच इतर व्यवहारही याच शिक्षकांमार्फत केले जातात, अशी माहिती समोर आली आहे. संस्थाचालकांच्या विरोधात गेल्यास शाळेतून निलंबित करण्याची भीती असते. तसेच निवडणूक झाल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले तरी संस्थाचालक सांगेल तेच ऐकतात, अशीच परिस्थिती आहे.
शिक्षण विभागालाही गोवले
आतापर्यंत निवडणूक आयोग माहिती न देणाऱ्या शाळा, कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करत होता. मात्र, संबंधित शाळा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित असल्यामुळे निवडणूक आयोगातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे प्रकरण शालेय शिक्षण विभागाकडे सोपवले. त्यावरूनही शालेय शिक्षण विभागात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रताप संस्थाचालकांचा, मनस्ताप शिक्षकांना
संस्थाचालक स्वत:च्या प्रचारासाठी शिक्षकांचा वापर करतात. त्यासाठी त्यांच्यावर दबावही टाकला जातो. त्यातून निवडणूक आयोगासारख्या सक्षम संस्थेलाही माहिती दिली जात नाही. हे सगळे संस्थाचालकांमुळेच होते. मात्र, त्याचा मनस्ताप शिक्षकांना सहन करावा लागत आहे.
- भाई चंद्रकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस, मराठवाडा शिक्षक संघ
सत्तार यांच्याशी संबंधित २५ शाळा
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित शाळांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील गारखेडा परिसरातील शिवनारायण जयस्वाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अस्लम खान रहीम खान, सिल्लोड शहर व तालुक्यातील अब्दुल रहीम उर्दू शाळा मुगलपुराचे मुख्याध्यापक शेख नईम, नॅशनल मराठी शाळेचे शेख गफ्फार कादर, नॅशनल मराठी शाळेचे गजानन निकम, नॅशनल उर्दूचे शोहेब अहेमद खान, जाकीर हुसैन नगरचे नॅशनल उर्दू शाळेचे अब्दुल वाहिद खान, जयभवानीनगरमधील उर्दू नॅशनल मराठीचे राजू काकडे, संत एकनाथचे दिनेश गोंगे, जमालशा कॉलनीतील नॅशनल उर्दूचे शेख राजीक अब्दुल निसार, अंधारी येथील नॅशनल मराठीचे हकीम खान पठाण, हिंदुस्थान उर्दूचे काजी इकमोद्दीन, हिंदुस्थान उर्दू प्राथमिकचे मोहंमद खलील शेख, डोंगरगाव येथील प्रगती उर्दू शाळेचे शेख सरफराज, प्रगती मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रताप बदर, नॅशनल मराठीचे विजय वाघ, केऱ्हाळा येथील नॅशनल उर्दूचे मुख्याध्यापक, घाटनांद्रा येथील नॅशनल मराठीचे संदीप सपकाळ, नॅशनल उर्दू प्राथमिकचे मुख्याध्यापक, शिवना येथील नॅशनल उर्दू प्रा. शाळेचे शेख राजकी शेख सादीक, नॅशनल उर्दू हायस्कूल अजिंठाचे माजेद खान जावेद खान, उर्दू हायस्कूल अंभईचे फईम बेग चाँद बेग मिर्झा, गंधेश्वर विद्यालय हट्टीचे संजय श्रीखंडे, नॅशनल मराठी विद्यालय पिंपळदरीचे लक्ष्मीकांत निकुंभ या शाळांसह सोयगाव तालुक्यातील नॅशनल मराठी शाळा सावळदबाराचे मुख्याध्यापक योगेश चोपडे व माणिकराव पालोदकर विद्यालय फर्दापूरचे मुख्याध्यापक काशिनाथ पाटील यांच्यावर गुन्हे नोंदविले आहेत.
गफार कादरी यांच्याशी ३ संबंधित शाळा
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. गफार कादरी यांच्याशी संबंधित शहरातील महापालिकेजवळील मौलाना आझाद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अब्दुल रज्जाक कादरी आणि खुलताबाद परिसरातील मौलाना आझाद हायस्कूल आणि मौलाना आझाद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शेख हसीबोदीने ईमोदोदीन यांच्यावर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला.