बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:04 AM2021-03-07T04:04:16+5:302021-03-07T04:04:16+5:30
वंदना मुरलीधर आडाणी, अशोक सखाराम वाघ (रा. श्रीकृष्णनगर, सिडको), मुरलीधर भगवानराव आडाणी आणि खरेदीदार महेश विजयराव घोरतळे (रा. म्हाडा ...
वंदना मुरलीधर आडाणी, अशोक सखाराम वाघ (रा. श्रीकृष्णनगर, सिडको), मुरलीधर भगवानराव आडाणी आणि खरेदीदार महेश विजयराव घोरतळे (रा. म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार राजेंद्र पृथ्वीराज राठोड हे रजिस्ट्री कार्यालयात दुय्यम निबंधक आहेत. त्यांच्या कार्यालयात आरोपी वंदना यांनी ५ जानेवारी रोजी दस्त नोंदणी कागदपत्रे सादर केली. यात त्यांच्या मालकीच्या आश्रफपूर येथील गट नंबर ८ मधील भूखंड क्रमांक ४३, ५९, ७७ आणि ६९ पैकी ७७ क्रमांकाचा भूखंड आरोपी घोरतळे याच्या हक्कात लिहून देत असल्याचे तसेच यावर साक्षीदार म्हणून आरोपी अशोक सखाराम आघाव आणि मुरलीधर आडाणी हे होते. वास्तविक हे भूखंड अशोक आघाव यांच्या नावे आहेत. असे असताना त्यांनी सातबारा उताऱ्यात खाडाखोड करून त्यावर वंदनाचे नाव असल्याचे नमूद करून तो बनावट सातबारा रजिस्ट्री कार्यालयात सादर केला. या व्यवहाराविषयी तक्रारदार यांना संशय आल्यावर त्यांनी तातडीने चिकलठाणा तलाठी सज्जाकडून या गटातील जमीन मालकाची माहिती जाणून घेतली. तेव्हा आरोपी वंदना यांनी स्वतःचा भूखंड असल्याचा जो सातबारा सादर केला, तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर राठोड यांनी सरकारतर्फे आरोपीविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे तपास करीत आहेत.