वक्फ मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:04 AM2021-06-26T04:04:42+5:302021-06-26T04:04:42+5:30
औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. अनेक वर्षांपासून बोर्डाची आर्थिक ...
औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. अनेक वर्षांपासून बोर्डाची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यावरही भविष्यात भर देण्यात येणार आहे.
मागील काही वर्षांपासून वक्फ बोर्डाची बैठकच घेण्यात आली नव्हती. शुक्रवारी दुपारी महसूल प्रबोधिनी येथे खा. फौजिया खा. यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. त्यानंतर फौजिया खा. यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वक्फ बोर्डाशी संबंधित विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वक्फची जमीन सामाजिक उपक्रमांसाठी वापरायला हवी. मागील काही वर्षांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. बोर्डाच्या सर्व सदस्यांनी महाराष्ट्र वक्फ बोर्डाला देशातील सर्वोत्तम बोर्ड करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. बदलापूर येथे ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केला, त्याचपद्धतीने जालना रोडवरील जमीन घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. बोर्डाचे मुख्यालय औरंगाबादला ठेवून विभागीय कार्यालय मुंबईला करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बोर्डात नूतनीकरणाची जवळपास १८०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे त्वरित मार्गी लावणे, जिल्हानिहाय बैठका, कर्मचारी भरती, रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. न्यायालयांमध्ये बोर्डाची भूमिका योग्यप्रकारे न मांडणाऱ्या विधिज्ञांना पॅनलवरून हटविण्याचा निर्णयही यावेळी घेतला.
बैठकीस खा. इम्तियाज जलील यांचीही उपस्थिती होती. माजी अध्यक्ष एम. एम. शेख, डाॅ. वजाहत मिर्झा, ॲड. ए. यू. पठाण, डॉ. मुदस्सर लांबे आदी उपस्थित होते.