फेसबुकवरील मैत्रिणीला पळवून नेणारा निघाला अट्टल गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:36 AM2017-10-31T00:36:28+5:302017-10-31T00:36:38+5:30
फेसबुक मैत्रिणाला लग्नाच्या आमिषाने महिनाभरापूर्वी पळवून नेणारा तिचा मित्र पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : फेसबुक मैत्रिणाला लग्नाच्या आमिषाने महिनाभरापूर्वी पळवून नेणारा तिचा मित्र पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध बुलडाणा जिल्ह्यातील विविध ठाण्यांत ९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याला सुरत येथून पकडून आणले.
सत्यपाल भीमराव वाकोडे (२५, रा. चिखली, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुकुंदवाडी परिसरातील रहिवासी महाविद्यालयीन मुलीची आणि सत्यपालची फेसबुकवर ओळख झाली होती. सुरुवातीला फेसबुकवर चॅटिंग केल्यानंतर त्यांच्यात मोबाइल नंबरची देवाणघेवाण झाली. व्हॉटस्अॅप या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सत्यपालने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला भेटण्यासाठी तो बुलडाणा जिल्ह्यातून औरंगाबादला यायचा. १७ सप्टेंबर रोजी कॉलेजला जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासह पलायन केले. काही दिवस पुणे, बुलढाणा आणि अन्य विविध शहरे बदलत तो सुरत येथे गेला. तेथील एका नातेवाईकाकडे दोघे राहू लागले. तेथे त्याने व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफीचे काम सुरू केले. तसे पाहिले तर तो बुलडाणा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार. त्याच्याविरुद्ध दंगल, मारहाणीचे आठ ते नऊ गुन्हे दाखल आहेत.
पोलीस पकडतील म्हणून तो सारखा जागा बदलत होता. एवढचे नव्हे, तर मोबाइलच्या लोकेशनवरून पोलीस आपल्यापर्यंत येऊ शकतात याचा अंदाजही त्याला होता, म्हणून त्याने महिनाभरात तब्बल १२ मोबाइल सीम बदलले. प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करी, त्यामुळे त्याला शोधणे पोलिसांना आव्हान होते. सायबर क्राइम सेलने अखेर त्याने त्याच्या आईला कॉल केल्याचा माग काढला आणि तो कॉल सुरत येथून आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सुरतला जाऊन पोलिसांच्या पथकाने सत्यपालला अटक करीत त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली. पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघ, हेमंत तोडकर व पथकाने ही कारवाई केली.