बोगस पटसंख्या दाखवणाऱ्या बारा शाळांवर होणार ‘फौजदारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:05 PM2018-08-03T17:05:23+5:302018-08-03T17:11:05+5:30
विशेष पटपडताळणी मोहिमेत बोगस विद्यार्थी संख्या दाखविणाऱ्या शहर आणि परिसरातील १२ शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यात सात वर्षांपूर्वी केलेल्या शाळांच्या विशेष पटपडताळणी मोहिमेत बोगस विद्यार्थी संख्या दाखविणाऱ्या शहर आणि परिसरातील १२ शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.३१) दिले. या कारवाईचा अहवालही तात्काळ देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत राज्यातील अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखविण्यात आल्याचे उघडकीस आले. अधिकचा लाभ, अनुदान आणि वाढीव तुकड्या मिळविण्यासाठी शाळांनी बोगस पटसंख्येचा आधार घेतल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांच्या निकालानंतर न्यायालयाने बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर सरकारने २४ जुलै २०१८ आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी २६ जुलै २०१७ रोजी पत्र पाठवून शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावर औरंगाबाद जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी औरंगाबाद शहर आणि परिसरातील १२ शाळांवर फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. गुन्हे दाखल केल्याचा अहवालही तातडीने शिक्षणाधिकारी कार्यालयाला द्यावा, अन्यथा विलंबाची सर्वस्वी जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची राहील, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी जयस्वाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही; तर गटशिक्षणाधिकारी साळुंके यांचे दोन्ही मोबाईल बंद होते.
हे आहेत शाळांवर आरोप
ज्या शाळांनी बोगस विद्यार्थी पटावर दाखवून शासनाची दिशाभूल करणे, वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेणे आणि शासनाच्या विविध योजनांवरील शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, मोफत पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, शिष्यवृत्ती इत्यादी लाभ मिळविले आहेत.
अपहाराची रक्कम ठरविणार
बोगस विद्यार्थी संख्या दाखवून नेमलेले शिक्षक, किती वेतन अतिरिक्त अदा केले, किती रकमेची मोफत पाठ्यपुस्तके अकारण वितरित झाली, किती पोषण आहार व मानधन जास्तीचे अदा केले?
या शाळांवर होणार कारवाई
अधिकची पटसंख्या दाखवून लाभ मिळविलेल्या औरंगाबाद शहर आणि तालुक्यातील शाळा पुढीलप्रमाणे : शुभस्नेहा शिक्षणसंस्था, क्रांतीनगर औरंगाबाद संचलित शुभम प्राथमिक विद्यालय क्रांतीनगर, चाचा नेहरू प्राथमिक शाळा, जयभीमनगर घाटी, ज्ञानगंगा पब्लिक स्कूल वडगाव कोल्हाटी, न्यू मॉडेल मराठी प्राथमिक शाळा, संजयनगर, बायजीपुरा गल्ली नं.१३, करुणा प्राथमिक शाळा संजयनगर, मुकुंदवाडी, तनवीर उल उत्फाल उर्दू प्राथमिक शाळा, असिफनगर घाटी, नालंदा प्राथमिक शाळा, रमानगर, नंदनवन विद्यामंदिर प्राथमिक शाळा प्लॉट नं. ४०, शांतीपुरा, जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उर्दू प्राथमिक शाळा, तारा पान सेंटर, उस्मानपुरा, विनय प्राथमिक शाळा, हमालवाडी, कर्मयोगी नामदेवराव पवार प्राथमिक विद्यालय, जवाहर कॉलनी आणि आदर्श विद्यामंदिर प्राथमिक शाळा, विद्युत कॉलनी, बेगमपुरा.