नायट्रोसेनच्या गोळ्यांची बेकायदा विक्री करणाऱ्याविरोधात गंभीर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 07:12 PM2018-11-16T19:12:49+5:302018-11-16T19:13:55+5:30
आजपर्यंत गोळ्यांची तस्करी करणाऱ्यांविरोधात केवळ ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायद्यानुसार कारवाई केली जात असे.
औरंगाबाद : डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय नायट्रोसेनच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या औषधी दुकानदाराविरोधात अंमली पदार्थ विक्री प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.
पोलीस आयुक्तांच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि ठोक दरात औषधी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक गुरुवारी आयुक्तालयात पार पडली. बैठकीला अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय काळे, निरीक्षक राजगोपाल बजाज आणि मेडिकल डीलर असोसिएशनचे मराठवाडाप्रमुख यांची उपस्थिती होती.
शहरात नायट्रोसेनच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी अनेकदा केलेल्या कारवाईत आरोपींकडून नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. नायट्रोसेन गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्याने या गोळ्यांची बेकायदेशीररीत्या विक्री सुरू झाली. गोळ्यांची तस्करी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनासह अन्न व औषधी प्रशासनाकडून नजर ठेवली जाते. आजपर्यंत गोळ्यांची तस्करी करणाऱ्यांविरोधात केवळ ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायद्यानुसार कारवाई केली जात असे. परिणामी अशा गुन्ह्यांत आरोपींना लगेच जामीन मिळतो.
नायट्रोसेनच्या गोळ्या गुंगीकारक असल्याने या गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात आहे. यामुळे नायट्रोसेनच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्यांविरोधात आता अंमली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एन.डी. पी.एस. अॅक्ट १९८५) नुसार कारवाई करण्यावर बैठकीत एकमत झाल्याचे डॉॅ. नागनाथ कोडे यांनी सांगितले.
औषध विक्रीचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक
डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शननुसार नायट्रोसेनच्या गोळ्यांची विक्री करावी, तसेच डॉक्टर, रुग्णांची नावे आणि फोन नंबरची माहिती औषध विक्रेत्यांनी स्वत:क डे ठेवावी,अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध विक्री करणाऱ्या दुकानदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.