शहरातील जनता नाकारणार गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार
By सुमेध उघडे | Published: February 27, 2020 07:32 PM2020-02-27T19:32:00+5:302020-02-27T19:36:01+5:30
राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये
- सुमेध उघडे
औरंगाबाद : राजकारणातील गुन्हेगारी संपावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. शहर शांत राहण्यासाठी तसेच विकासात्मक कामे मार्गी लागण्यासाठी शहरातील आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार आम्ही नाकारू, असे स्पष्ट मत शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’ सर्वेक्षणातून मांडले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मतदान केंद्राबाहेर फलकावर ठळकपणे लावण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा उपक्रम वाखाणला गेला होता. आता त्याच्या एक पाऊल पुढे जात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील स्वत:ची वेबसाईट, एक स्थानिक व एक राष्ट्रीय वृत्तपत्र, तसेच फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांतून प्रसिद्ध करावा, असे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर शहरातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १८ ते ३० वर्षे या वयोगटातील ६० टक्के, ३१ ते ४५ वयोगटाचे ३० टक्के आणि ४६ वयापेक्षा अधिकच्या १० टक्के उत्तरदात्यांचा समावेश होता.
राजकारणातील गुन्हेगारी संपावी या सर्वोच्च न्यायालयाच्या मतास १०० टक्के उत्तरदात्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर राजकीय पक्ष गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट का देतात? यावर ८० टक्के उत्तरदात्यांनी असे लोक पक्षाला पैसा पुरवतात, असे परखड मत नोंदवले, तर १० टक्के उत्तरदात्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच राजकीय पक्ष चालवत असल्याचे वाटते, तसेच १० टक्के उत्तरदात्यांच्या मते लोकच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देतात, असे खोचक मत नोंदवले आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांवरील गुन्ह्याचा तपशील जाहीर करावा का? या प्रश्नाससुद्धा १००% उत्तरदात्यांनी पाठिंबा दर्शवला असून, प्रत्येक उमेदवाराचा गुन्हेविषयक तपशील राजकीय पक्षांनी जाहीर करावा, असे म्हटले आहे.
राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये
यासोबतच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नाच्या उत्तरात १००% उत्तरदात्यांनी अशा उमेदवारांना राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये, असे म्हटले आहे, तसेच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार दिले, तर तुम्ही नाकारणार का? या प्रश्नावर १००% उत्तरदात्यांनी आम्ही आगामी निवडणुकीत अशा उमेदवारांना नाकारणार असल्याचे स्पष्ट केले.