उद्योगांपुढे मागणीचे संकट; ३०-४० टक्केच उत्पादन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:20 PM2020-05-30T16:20:58+5:302020-05-30T16:25:21+5:30
प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे.
- विजय सरवदे
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या उत्पादनांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, मोठ्या उद्योगांकडून पुरेशा प्रमाणात मागणी नसल्यामुळे लघु उद्योग धीम्या गतीने सुरू आहेत. प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे.
लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून संपूर्ण उद्योग ठप्प झाले होते. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रेड झोन वगळून उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चितेगाव, पैठण औद्योगिक परिसरातील उद्योग सुरू झाले. त्यानंतर अलीकडे चौथ्या टप्प्यात शहरातील चिकलठाणा व रेल्वेस्टेशन या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना परवानगी मिळाली.
चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसरात जवळपास साडेचारशे ते पाचशे उद्योग असले तरी आतापर्यंत सव्वादोनशे उद्योग सुरू झालेले आहेत. या परिसरातील उद्योग प्रामुख्याने आॅटोमोबाईल उद्योगांवर अवलंबून आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे दुचाकी, तीनचाकी विक्रीचे शोरूम बंद असल्यामुळे या वाहननिर्मितीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे आॅटोमोबाईल कंपन्यांकडून अवलंबित उद्योगांना पुरेशा प्रमाणात मागणी (आॅर्डर) नाही. परिणामी, सध्या मागच्या राहिलेल्या व निर्यातीसंबंधीच्या मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतीतीत दीड शिफ्टमध्ये सुमारे तीन ते चार हजार कामगार काम करीत आहेत. औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी कोरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे जवळपास ५० ते ६० उद्योग बऱ्यापैकी सुरू आहेत.
बाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाही
बाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन उघडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रामुख्याने वाहन विक्रीचे शोरूम सुरू झाल्यास आॅटोमोबाईल कंपन्या पूर्ण ताकदीने सुरू होतील व या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळतील. आॅटोमोबाईल डीलर्सचे व्यवहार जोपर्यंत सुरू होत नाहीत, तोपर्यंत औरंगाबादची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार नाही. सध्या लघु उद्योगांपुढे आॅर्डरची अडचण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना बस, काही जण कारमधून ने-आण करतात. सोमवारपर्यंत कामगारांना दुचाकीवरून येण्यास परवानगी मिळेल.
- मनीष अग्रवाल, सचिव, मासिआ