मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:03 AM2021-07-07T04:03:26+5:302021-07-07T04:03:26+5:30

पाऊस लांबला : ६५ टक्के पेरण्या पूर्ण, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण औरंगाबाद : मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. ...

Crisis of double sowing in Marathwada | मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट

मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट

googlenewsNext

पाऊस लांबला : ६५ टक्के पेरण्या पूर्ण, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

औरंगाबाद : मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, येणाऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ६३ टक्के, जालन्यात ७६ टक्के, बीड जिल्ह्यात ८६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात ५९ टक्के, उस्मानाबाद ६२ टक्के, नांदेड ७६ टक्के, परभणी ६३ टक्के, हिंगोलीत ७१ टक्के पेरण्या आजवर झाल्या आहेत. ६५ टक्क्यांच्या आसपास मराठवाड्यात पेरण्या झाल्याची प्राथमिक आकडेवारी सांगते.

सोमवारी शेतकऱ्यांनी विभागीय प्रशासनातील वरिष्ठांची भेट घेऊन पेरणी आणि पाऊस याबाबत चिंता व्यक्त केली. सध्या पावसाचा खंड असला तरी जुलै महिन्यात पावसाचा चांगला अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत जर पावसाने दमदार हजेरी लावली नाहीतर विभागातील परिस्थिती पाहता दुबार पेरणी करावी लागेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

यंदाच्या जूनमध्ये २०० मि.मी.पाऊस

यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. विभागात यंदाच्या जून महिन्यात फक्त आठ दिवस पाऊस झाला आहे. २०० मिलीमीटर पावसाची नोंद विभागात नोंदविली गेली असली तरी अनेक जिल्ह्यांत जून महिन्याची सरासरीदेखील पूर्ण झालेली नाही.

गेल्या जून महिन्यात २० दिवस पावसाची नोंद

गेल्यावर्षी मागील दहा वर्षांत पहिल्यांदाच २३४ टक्के पाऊस जून महिन्यात बरसला होता. २० दिवस पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला होता. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १९ दिवस पाऊस झाला होता. विभागात ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ७५०.८१ मिलीमीटर पाऊस विभागात होणे अपेक्षित आहे. ३० जून २०२० पर्यंत विभागातील आठही जिल्ह्यांत सरासरी २३४.२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

Web Title: Crisis of double sowing in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.