वैजापूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:03 AM2021-07-09T04:03:51+5:302021-07-09T04:03:51+5:30
वैजापूर : गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने वैजापूर तालुक्यातील ७२ टक्के क्षेत्रावरील खरीप पेरण्या संकटात सापडल्या आहेत. ...
वैजापूर : गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने वैजापूर तालुक्यातील ७२ टक्के क्षेत्रावरील खरीप पेरण्या संकटात सापडल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तुषार व ठिबक सिंचन करून शेतकरी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जून महिन्यात वैजापूरसह खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी, गारज, लासुरगाव, महालगाव, नागमठाण व लाडगाव या दहा मंडळात सरासरी १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. महिन्याची सरासरी ओलांडून जवळपास १२८ टक्के पाऊस झाला आहे. कमी पाऊस होऊनही सुरुवातीच्या ओलीतावर पुढे पाऊस पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यात १ लाख ५३ हजार ४०६ हेक्टर क्षेत्र आहे. यातील १ लाख ३५ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. जून महिन्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी ९७ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. तर दहा टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. तालुक्यात मका व कपाशी ही दोन प्रमुख नगदी पिके असून याशिवाय सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मूग, उडीद, तूर, भाजीपाला व इतर कडधान्ये, तृणधान्ये व गळित धान्ये घेतली जातात; परंतु जून महिन्यातील मृगाच्या पावसावर शेतकऱ्यांचे पेरणीचे गणित अवलंबून असते. त्यावरच खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांचे व आंतरपिकांचे नियोजन केले जाते.
---
पिकाचे नाव : लागवड क्षेत्र (हेक्टरी)
कापूस : ४९,५८३
मका : ३१,९५४
बाजरी : ३,४९६
सोयाबीन : २,५७५
भुईमूग : १,७९०
मूग : ३,२४४
उडीद : ३९
तूर : १,५२७
ऊस : १,२०४
भाजीपाला : ८३४
---
कोट :
मी पाच एकर क्षेत्रात कपाशीच्या पिकात मुगाचे आंतरपीक घेतले आहे; पण एक ते दीड महिन्यापासून पाऊस न पडल्याने दोन्ही पिके सुकायला लागली आहेत. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. - संतोष कुंभाडे, शेतकरी, धोंदलगाव.