'संकट आले,आधी देवाचा धावा',सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खैरेंचा यज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:54 PM2022-07-19T17:54:23+5:302022-07-19T17:56:28+5:30
याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही वर्षांपूर्वी भेट दिल्याची माहिती आहे.
औरंगाबाद: शिवसेनेवरील संकट दूर व्हावे यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवाचा धावा केला आहे. दौलताबादच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात तब्बल सात तास खैरे यांनी यज्ञ केला. पक्षावरील संकट दूर व्हावे, सुप्रीम कोर्टात चांगला निकाल लागावा अशी प्राथना केल्याची माहिती खैरे यांनी दिली.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील संकट दिवसेंदिवस वाढत जात आहेत. आज शिवसेनेच्या १२ खासदारांनी दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना देखील या बंडखोर खासदारांनी गटनेता बदल करण्याबाबत पत्र दिले आहे. आमदारांच्या पाठोपाठ खासदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, उद्या २० जुलै रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेनेतर्फे बंडखोर शिंदे गटाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाची पुढील दिशा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शेवटचा उपाय म्हणून देवाचा धावा केला आहे. खैरे यांनी दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज यज्ञ केला. तब्बल सात तास खैरे यांनी यज्ञ करत पक्षावरील संकट दूर व्हावे, सुप्रीम कोर्टात चांगला निर्णय लागावा अशी प्राथना केली. याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही वर्षांपूर्वी भेट दिल्याची माहिती आहे.
संकट असेल तर आधी देवाकडे धावा
संकट असेल, कोर्टाच्या केसेस असतील तर प्रथम देवाचा धावा करतो, यामुळे आज येथे यज्ञ केल्याचे खैरे म्हणाले. तसेच बंडखोरीकरून खासदार जात आहेत, त्यांना काय मिळणार आहे असा सवाल देखील त्यांनी केला. मी वीस वर्ष लोकसभेत होतो, अनेक समित्यांवर काम केले. आम्ही सर्व खासदार एकत्र बसायचो. त्यांच्या बंडखोरीने माझ्या डोळ्यात अश्रू आल्याच्या भावना खैरे यांनी व्यक्त केल्या.