संकटाला बळ देई साक्षात्कार माणुसकीचा...

By Admin | Published: January 2, 2015 12:37 AM2015-01-02T00:37:13+5:302015-01-02T00:45:13+5:30

विशाल सोनटक्के ,उस्मानाबाद उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचा परिसर. वेळ दुपारची... एक अकरा ते बारा वर्षाचा चिमुकला, केंद्रावरील सुरक्षा कक्षामध्ये डोकावतो.

The crisis has strengthened humanity ... | संकटाला बळ देई साक्षात्कार माणुसकीचा...

संकटाला बळ देई साक्षात्कार माणुसकीचा...

googlenewsNext


विशाल सोनटक्के ,उस्मानाबाद
उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचा परिसर. वेळ दुपारची... एक अकरा ते बारा वर्षाचा चिमुकला, केंद्रावरील सुरक्षा कक्षामध्ये डोकावतो. ‘काका, मी खुप छान गाणं गातो, मला संधी मिळेल का? एवढ्याशा वयात आकाशवाणीत गाण्याची संधी मिळण्यासाठी दार ठोठावणारा किंबहुना तो पहिलाच असावा. अतिशय पहाडी आवाजात त्याने आकाशवाणी केंद्राच्या आवारातच गाण्याचा सूर लावला. ते ऐकूण उपस्थितही अवाक् झाले. त्यानंतर त्याच्या आयुष्याची चित्तरकथा ऐकल्यानंतर सर्वांच्याच डोळ्याच्या कडा ओलावल्या. अन् मग त्याने अनुभवली उस्मानाबादकरांच्या माणुसकीची आभाळभर माया !
साधारणत: दहा-अकरा वय असलेला हा मुलगा २९ डिसेंबर रोजी कळंब येथील संस्थेतून पळून उस्मानाबादला आला. बसस्थानकासमोर शेख नबी शेख चाँद यांचे रसवंतीगृह आहे. या दुकानाच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास सुमारे तासभर घुटमळला. त्यानंतर या नबी चाचाच्या हातावर पाच रुपये टेकवून त्याने ग्लासभर रस घेतला आणि पुन्हा बसस्थानकात गेला. रात्री नऊच्या सुमारास नबी शेख यांनी रसवंतीगृह बंद केले. त्यावेळी या दुकानाच्या शेजारी कडाक्याच्या थंडीत तो एकटाच थांबलेला दिसून आला. नबी शेख त्याच्या जवळ गेले. तर तो हमसून रडत होता. काय झाले..कोठून आलास..? अशी विचारणा केल्यावर त्याने कळंब येथून पळून आल्याचे कबूल केले. कोठे जायचे आहे...आई, वडील काय करतात? असे शेख यांनी विचारल्यानंतर तो पुन्हा रडू लागला. आई-वडील लहानपणीच वारले..हे त्याचे उत्तर ऐकल्यानंतर शेख यांच्यातील माणूस जागा झाला. त्यांनी आणखी काही न विचारता, चल काही तरी खाऊ, असे म्हणून त्याला बाजुच्या हॉटेलमध्ये नेले. तेथे नाष्टा दिल्यानंतर ते पुन्हा दुकानात घेऊन आले. तुला राहायचे असेल तर इथं रहा. माझा डबा येतो. दोघेही मिळून खाऊ, असे सांगितले. शेख यांनी हे ममत्व दाखविल्यानंतर तो चिमुरडाही थोडासा खुलला. आणि मग रसवंतीगृहात त्याने नबी शेख याच्याबरोबरच इतर कर्मचाऱ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. ३० आणि ३१ डिसेंबर असे त्यापुढील दोन दिवस तो या रसवंतीगृहातच होता. नबी शेख यांनीच त्याचा पाहुणचार केला.
गुरुवारी दुपारच्या सुमारास रसवंतीगृहात कोणालाच न सांगता तो शहरात भटकंतीसाठी निघाला. बार्शी रस्त्यावर असलेल्या एका सेलमध्ये थोडासा वेळ घालविल्यानंतर तो एसटी कॉलनी मार्गे समतानगरकडे भटकत असताना त्याला आकाशवाणी केंद्र दिसले. आणि मग थेट या केंद्रामध्ये जाऊन ‘मला गाता येतं..संधी मिळेल का?’ अशी त्यानं विचारणा केली. आकाशवाणी केंद्रप्रमुख संजय बरिदे गाण्याची संधी मागणाऱ्या या एवढ्याशा मुलाला पाहून आचंबित झाले. त्याच वेळी इतर कर्मचारीही जमा झाले. मुलाला केंद्रामध्ये नेऊन गाण्यास सांगितले असता, अत्यंत पहाडी आवाजात त्याने ‘ देवा तुझ्या दारी आलो..गुणगान गाया...तुझ्या विना माणसाचा...जन्म जाई वाया’ हे सुरेल गीत सादर केले. त्याचे वय..त्याच्या आवाजाची उंची पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आकाशवाणीमध्ये एक-दोन नव्हे तर त्याची तब्बल तीन गाणी रेकॉर्ड करण्यात आली. त्यानंतर त्याच्या गाण्याचे कौतुक करीतच सुरू झाली त्याची विचारपूस. अकरा-बारा वर्षाच्या हा चिमुरडा नगर जिल्ह्यातला जन्मताच त्याला एचआयव्हीने ग्रासले आहे. याच आजाराने आई-वडील गेले. पण तोच शाप मुलाच्या नशीबी आला. घरी आजी आणि मामा एवढीच काय ती जवळची माणसं. दारिद्र्याने खचलेली. त्यातच या मुलाच्या चंचल तसेच खोडसाळपणालाही वैैतागलेली. त्यामुळे आजी मामा रागावल्यानंतर तो घरातून पळून गेला. असाच एका ठिकाणी पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी कळंब येथील एका संस्थेमध्ये त्याची रवानगी केली. तेथ रहात असतानाच सोबतच्या मुलांशी काही बाबीवरुन बिनसल्यानंतर तो २९ रोजी संस्थेमध्ये कोणालाही न सांगता त्याने थेट उस्मानाबाद गाठले. त्याची ही व्यथा ऐकल्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले. त्याची गायनाची शैली आणि आवाज ऐकल्यानंतर हा चिमुरडा पुढे खुप चांगला गायक होवू शकतो. या चिमुकल्याला हक्काचा आधार मिळाला पाहिजे, यासाठी मग सुरू झाले तळमळीचे प्रयत्न.
या मुलाची माहिती केंद्र प्रमुख संजय बरिदे यांनी पत्रकार महेश पोतदार आणि इतरांना दिली. या मंडळीनी आकाशवाणीत जावून त्या मुलाची व्यथा ऐकली. एकीकडे अचंबित करणारा त्याचा आवाज तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यात एचआयव्हीमुळे उभे टाकलेले डोंगराएवढे संकट. हे पाहून ही मंडळी गहिवरून गेली. आणि मग या मुलाला हक्काचा निवारा देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. बालकल्याण समितीकडे जाऊ या..म्हटल्यानंतर तो रडू लागला. त्यांच्याकडे नको ते रिमांड-होममध्ये पाठवितात, असे म्हंटल्यानंतर मग त्याच्या कलाने घेत, पोतदार व त्यांच्या मित्रांनी त्याला आवडीच्या वस्तू देण्यासाठी बाजारपेठेत नेले. त्याच वेळी तेथे नगरसेवक प्रदीप मुंडे यांची भेट झाली. मुंडे हेही मुलाची व्यथा ऐकून सद्गतीत झाले. आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे या मुलाला जे हवं ते मला घेऊन देऊ द्या, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुंडे यांनी या चिमुकल्याला दुकानामध्ये नेऊन सांगेल त्याप्रमाणे दोन ड्रेस, स्वेटर, ब्लॅकेंट, बनियन, टॉवेल यासह खेळणी आणि इतर अत्यावश्यक वस्तू त्याच्या पसंतीनुसार घेऊन दिल्या. हे पाहुन या चिमुकल्याचा चेहराही आनंदाने ओसंडून गेला होता. अखेर सायंकाळी त्याला बालकल्याण समितीपुढे उभे करण्यात आले. या समितीने एआरटी या नियमित औषधांची उपलब्धता असलेल्या पंढरपूर येथील संस्थेमध्ये पाठविण्याचे आदेशित केले. या मुलाला शुक्रवारी पंढरपूरला पाठविण्यात येणार आहे. त्याची रात्रभर तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. मात्र त्याने रात्री नबी चाचाकडेच राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला रात्रीसाठी पुन्हा रसवंतीगृहामध्ये शेख यांच्याकडे सोडण्यात आले.

Web Title: The crisis has strengthened humanity ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.