किडनी प्रत्यारोपण रुग्णांवर संकट; योजनेतून ३ वर्षे मिळणारी औषधी आता एक वर्षच

By संतोष हिरेमठ | Published: July 11, 2024 03:57 PM2024-07-11T15:57:40+5:302024-07-11T15:58:07+5:30

सरकारने एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतले

Crisis on Kidney Transplant Patients; Medicines which are available for 3 years under the scheme are now only for one year | किडनी प्रत्यारोपण रुग्णांवर संकट; योजनेतून ३ वर्षे मिळणारी औषधी आता एक वर्षच

किडनी प्रत्यारोपण रुग्णांवर संकट; योजनेतून ३ वर्षे मिळणारी औषधी आता एक वर्षच

छत्रपती संभाजीनगर : किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी १ जुलैपासून जनआरोग्य योजनेत दीड लाखावरून ४.५ लाख रुपये देण्यास सुरुवात झाल्याने किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला. मात्र, प्रत्यारोपणानंतर औषधींसाठी ३ वर्षांसाठी दर ६ महिन्यांनी मिळणारी प्रत्येकी ५० हजारांची मदत आता एक वर्षच दिली जाईल, असे रुग्णांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन वर्षांचा औषधी खर्च कसा भागवणार, अशी चिंता राज्यभरातील किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना सतावत आहे. ‘सरकारने एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतले’, अशी ओरड त्यांच्याकडून होत आहे.

एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महाराष्ट्र ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत २८ जुलै २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. ही विस्तारित स्वरुपातील योजना सोमवारपासून लागू करण्यात आली. यामध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठीची मर्यादा ४.५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. पूर्वी त्यासाठी दीड लाख रुपये मिळत होते. पूर्वी प्रत्यारोपणानंतर ३ वर्षांसाठी दर सहा महिन्यांनी प्रत्यारोपणानंतर इम्युनोसप्रेशन थेरपीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये मिळत होते. परंतु, आता एक वर्षच दर सहा महिन्यांनी ५० हजार रुपये मिळतील. म्हणजे एकूण एक लाख रुपये मिळतील, असे रुग्णांना सांगण्यात येत आहे. पॅकेज दिसत नाही आणि गाइडलाइन नसल्याची कारणे रुग्णालयांतील आरोग्य मित्र सांगतात.

मायबाप सरकार...
हा खूप मोठा धक्का आहे. या गोळ्यांचा खर्च महिना १५ हजार ते २० हजार रुपये असतो. सरकारने यावर काहीतरी उपाय काढावा.
- बालाजी मुंढे, लातूर

आधीच हलाखीची परिस्थिती
आधीच परिस्थिती हलाखीची असताना सरकारने औषधी एकच वर्षांसाठी केली. सरकारने औषधींची मर्यादा ३ वर्षांवरून ५ वर्षे करण्याची गरज आहे. माझ्यासमोर तर गंभीर प्रश्न उभा आहे.
- ॲड. अरुण पांडव, छत्रपती संभाजीनगर

निर्णय मागे घ्यावा
राज्य सरकारने किंवा ज्यांनी कुणी हा निर्णय घेतला आहे, त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. जेणेकरून माझ्यासारख्या असंख्य रुग्णांना औषधांचा लाभ घेता येईल.
- राजेश चव्हाण, भोकर, ता. श्रीरामपूर

पैसे जमा करण्याची वेळ
माझे ऑक्टोबर २०२३मध्ये दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण झाले. गोळ्यांच्या खर्चासाठी आशेचा किरण होता तो म्हणजे जीवनदायी आरोग्य योजनेतून ३ वर्षे मोफत मिळणाऱ्या गोळ्या. आता पैसे जमा करण्याची वेळ येणार आहे.
- रविराज पाटील, चाळीसगाव

गाइडलाइनची प्रतीक्षा
यासंदर्भात गाइडलाइनची प्रतीक्षा आहे. असा काही बदल झाल्याचे अजून तरी समोर आलेले नाही. रुग्ण यासंदर्भात तक्रार करू शकतात, असे एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महाराष्ट्र ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ जिल्हा समन्वयक डाॅ. मिलिंद जोशी म्हणाले.

Web Title: Crisis on Kidney Transplant Patients; Medicines which are available for 3 years under the scheme are now only for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.