लाडसावंगी परिसरात एक, दोन नव्हे, तिबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:04 AM2021-07-09T04:04:16+5:302021-07-09T04:04:16+5:30
लाडसावंगी : परिसरात निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकऱ्यांनी हात टेकले आहेत. येथे गेल्या महिनाभरात एकबार, दुबार नव्हे, तर तिबार पेरणीचे संकट ...
लाडसावंगी : परिसरात निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकऱ्यांनी हात टेकले आहेत. येथे गेल्या महिनाभरात एकबार, दुबार नव्हे, तर तिबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उभे राहिले आहे. अगोदरच दुबार पेरणीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना आता येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस न पडल्यास बियाणे व खतांसाठी पैसे कोठून आणावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरात महिनाभरापासून सर्वदूर पाऊस झालेला नाही. सुरुवातीला ७ व ८ जूनदरम्यान जेमतेम पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मका, कपाशी, तूर, मूग, उडदाच्या पेरण्या उरकून टाकल्या. मात्र, नंतर पाऊस न आल्याने पेरलेले उगवले नाही किंवा जे उगवले ते नंतर करपून गेले. यानंतर २७/२८ जूनदरम्यान दोन दिवस पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आशेपोटी पैशांची इकडून तिकडून तरतूद करून दुबार पेरणी केली. पिकेही चांगली उगवून आली आहेत. मात्र, दहा दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे ही पिके कोमेजून जाऊ लागली असून सलाइनवर आहेत. जर येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर तिबार पेरणीचे संकट कोसळणार आहे आणि तसे झाले, तर बियाणे, खते, मजुरीचा खर्च कोठून आणायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
कोट ......
080721\08_2_abd_54_08072021_1.jpg
पावसाच्या प्रतिक्षेत असलेले कोवळे अंकूर.