फक्त सल्ल्यासाठी कोटींची उधळपट्टी
By Admin | Published: July 14, 2015 12:31 AM2015-07-14T00:31:38+5:302015-07-14T00:31:38+5:30
औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेंतर्गत प्रकल्प सल्लागार म्हणून एका त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली असून, तिला आतापर्यंत तब्बल २ कोटी ६० लाख रुपये अदा करण्यात
औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेंतर्गत प्रकल्प सल्लागार म्हणून एका त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली असून, तिला आतापर्यंत तब्बल २ कोटी ६० लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती सोमवारच्या विशेष सर्वसाधारण सभेत समोर आली.
मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्यावरील चर्चेदरम्यान प्रकल्प सल्लागार संस्थेचा मुद्दा उपस्थित झाला. समांतर योजनेचा करार औरंगाबाद मनपा आणि वॉटर युटिलिटी कंपनीत झाला आहे; पण त्यासोबतच प्रकल्प सल्लागार म्हणून युनिटी कन्सल्टन्सी, पुणे नावाच्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
ती कशासाठी असा सवाल राजू वैद्य यांनी उपस्थित केला. त्यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी जलवाहिनीच्या कामावर देखरेख आणि तांत्रिक सल्ला देण्यासाठी म्हणून ही संस्था नेमण्यात आल्याचा खुलासा केला. तसेच तिला फीसच्या स्वरूपात प्रकल्प खर्चाच्या २.३५ टक्के इतकी रक्कम दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा काही नगरसेवकांनी आतापर्यंत या संस्थेला किती रक्कम दिली, अशी विचारणा करण्यात आली. त्याच्या उत्तरात कोल्हे यांनी सांगितले की, आतापर्यंत या संस्थेला २ कोटी ६० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र, करारानुसार निम्मी रक्कम कंपनी आणि निम्मी रक्कम मनपा देते, त्यामुळे मनपाच्या तिजोरीतून १ कोटी ३० लाख रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती दिली.
ही माहिती समोर आल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांनी कंपनीने आतापर्यंत काय काम केले याचे आॅडिट करून त्याची प्रत सादर करावी, तसेच आॅडिट होईपर्यंत कंपनीचे यापुढील देयक थांबवावे, असे आदेश दिले.
सदोष माईक सिस्टीमवरून आज मनपाच्या विशेष सभेत गदारोळ झाला. नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर आयुक्तांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. सभेच्या सुरुवातीपासूनच अनेक टेबलवरील माईक बंद होते. त्यामुळे नगरसेवकांना बोलता येत नव्हते.
४विशेष म्हणजे मागील सर्वसाधारण सभेतही माईकचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा महापौरांनी ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. संतापलेल्या काही नगरसेवकांनी हा आमचा आवाज दाबण्याचा डाव असल्याचा आरोप केला. तर काही जणांनी महापौरांचे आदेश प्रशासन ऐकत नसल्याचे मत मांडले.
४ यानंतर मनपा आयुक्त महाजन यांनी माईक दुरुस्त न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि २० जुलैपर्यंत ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. माईक बंद असल्यामुळे सभेदरम्यान एकदा २० मिनिटांसाठी सभाही तहकूब करण्यात आली.