गंभीर रुग्णांवर प्राधान्याने उपचार होतील; ऑक्सिजन तुटवडा नसून वाहतुकीमुळे पुरवठ्यात अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 06:48 PM2020-09-16T18:48:37+5:302020-09-16T18:56:33+5:30
कोरोना लढ्यासाठी निधी कमी पडणार नाही
नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मी स्वत: शासनपातळीवरुन दक्ष असून शासनाकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही, फक्त तुम्ही स्वत: काळजी घेत आरोग्य विभागाच्या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सहकार्य करा, असे आवाहन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या प्रारंभानिमित्त त्यांनी शहरातील शिवनगर येथील स्थानिक रहिवासी दत्ता इंगळे व कुसुमबाई दराडे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, मनपा सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडिवाले, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, प्रभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी मो. बदीयोद्यीन, आशा वर्कर्स उपस्थित होते.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत मी प्रशासनासोबत आढावा बैठका घेत असून आरोग्य सेवासुविधेची कुठलीही कमतरता पडणार नाही, यासाठी नियोजन करीत आहे. वाहतुकीमुळे आॅक्सिजन पुरवठ्यात अडचणी येत आहेत. मात्र कुठलाही तुटवडा नसून वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्याचे योग्य व्यवस्थापन जिल्हा प्रशासनामार्फत आता अधिक प्रभावीपणे केले जाईल असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
गंभीर रुग्णांवर प्राधान्याने उपचार
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नुकतेच ८० खाटांचे दोन आयसीयू वॉर्ड अद्ययावत केले आहे. यात ६४ खाटा या आयसीयूच्या तर १६ खाटा या आॅक्सिजनच्या तयार आहेत. पूर्वीच्या १७० आयसीयू खाटांमधून ही नवी भर पडली असून आता अतिगंभीर जे बाधित आहेत त्यांच्यावर येथे प्राधान्याने उपचार केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.