टीका, टोला अन् निशाणा; पीटलाईनच्या समारंभात जलील-दानवे-कराडांनी साधली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:26 PM2022-10-04T15:26:23+5:302022-10-04T15:26:23+5:30
पीटलाइनच्या समारंभात नेत्यांनी साधली संधी, रेल्वे स्टेशनवर घसरले राजकारणाचे ‘इंजिन’
औरंगाबाद : रेल्वे स्टेशनवर सोमवारी पीटलाइनच्या पायाभरणी समारंभाच्या निमित्ताने एकमेकांवर टीका करण्याची, टोला लगावण्याची आणि निशाणा साधण्याची संधी राजकीय नेत्यांनी साधली. राजकारणाचे ‘इंजिन’च यानिमित्ताने घसरल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.
खा. इम्तियाज जलील यांनी मनोगत व्यक्त करताना प्रारंभीच ‘बहोत देर से दरपे आँख लगी थी, हुजूर, आते आते बहोत दूर कर दी...,’ या ओळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाहत म्हटल्या. ‘अच्छे दिन आने वाले है...,’ असा नारा ऐकला होता. केंद्रीय रेल्वेमंत्री आल्याने औरंगाबाद रेल्वेचे ‘अच्छे दिन’ येतील, अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी मराठवाड्यातील रेल्वेच्या स्थितीवर, रेल्वेचे नेटवर्क नसल्याविषयी खंत व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणाला सुरुवात करताच खा. इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. ‘मराठवाड्यात रेल्वेचे नेटवर्क नाही, याचे कारण म्हणजे आपण ब्रिटिश नव्हे तर निजाम स्टेटमध्ये होतो. निजाम स्टेटमध्ये होतो म्हणून मागास आहे. कारण निजामाला रेल्वेची गरज नव्हती; परंतु आता मोदींचे सरकार आले असून, मराठवाड्यातील रेल्वेचे नेटवर्क वाढेल.’ ‘आदमी तो एमआयएम का है, लेकिन लगता है की ये बीजेपी है क्या...’ असे म्हणत ‘छत्रपती संभाजीनगरसाठी मागणी केली पाहिजे होती; पण तुम्ही औरंगाबादसाठी मागत आहात,’ असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी खा. इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.
दुहेरीकरण, विद्युतीकरण मार्गी लागले आहे. नांदेड विभाग मध्य रेल्वेत जोडण्याची मागणी राजकीय मुद्दा आहे. हा मार्गी लागला तर पुढच्या निवडणुकीत तुम्ही लोकांना काय म्हणणार, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. अंबादास दानवे हेदेखील आजकाल टोकतात, असेही रावसाहेब दानवे म्हणाले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार आल्याचे डाॅ. भागवत कराड म्हणाल्याचा उल्लेख अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणात केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘साऊथ स्टाइल’मध्ये नेत्यांचा नावाचा उल्लेख करतानाही समारंभस्थळी हास्याचे फवारे उडत होते.
‘दानवे माझ्याकडे पाहताय, मी जास्त बोलणार नाही’
समारंभात डाॅ. भागवत कराड यांनी मार्गदर्शन करीत विविध मागण्या मांडत होते. ‘खूप मागण्या आहेत; पण दानवे साहेब माझ्याकडे पाहत आहेत, मी जास्त बोलणार नाही,’ असे डाॅ. कराड म्हणाले. त्यानंतर एका मिनिटात डाॅ. कराड यांनी आपले भाषण आटोपते घेतले. औरंगाबादेत पहिल्यांदा रेल्वे मंत्री आल्याचेही वक्तव्य डाॅ. कराड यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर खा. जलील यांनी हे साफ खोटे असल्याचे म्हटले.