पैठणची मगर निघाली विदर्भाकडे; शुक्रवारी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:32 AM2017-11-11T00:32:19+5:302017-11-11T00:32:23+5:30
जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर औरंगाबाद विभागाला नागपूरच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या परवानगीनंतर मगरीला शुक्रवारी रात्री सुरक्षितपणे पिंज-यात टाकून वाहनातून विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बुधवारी रात्री जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर औरंगाबाद विभागाला नागपूरच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या परवानगीनंतर मगरीला शुक्रवारी रात्री सुरक्षितपणे पिंज-यात टाकून वाहनातून विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना करण्यात आले आहे. तोतला डोहात तिला सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.
बुधवारी रात्री साडेदहा वाजता जायकवाडीच्या पायथ्याशी कावसान गावाच्या रस्त्यावरून ही मगर जाताना काही दुचाकीस्वारांना दिसली. पैठण येथील सर्पमित्र दिलीप सोनटक्के व राजू गायकवाड यांनी साहेबा ढवळे, राजू करवंदे, शरद शिंदे, जितेंद्र अटक, स्वप्नील साळवे, गणेश पातकळ, विष्णू जगताप, आशिष मापारी, आतिष गायकवाड, जालिंदर अडसूळ यांच्या मदतीने ८ फूट लांबीची व दीडफूट रुंद मगर जेरबंद करून ती रात्रीच पैठण येथील वन विभागाच्या हवाली केली होती.
मगरीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने ती समुद्रात किंवा अन्य ठिकाणी सोडावी, असे पत्र वन विभागाला जायकवाडी प्रशासनाने दिले होते. त्यामुळे मगर सुरक्षित व निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्याचा प्रश्न वन विभागाला पडला होता.
या मगरीविषयी सीसीएफ महाजन यांनी नागपूरच्या वरिष्ठांकडे विचारणा केली होती, त्यानुसार रीतसर परवानगीचे पत्र वन विभागाला प्राप्त झाल्यावर शुक्रवारी ही मगर पेंच येथील व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना करण्यात आली.