जायकवाडीतील ‘ती’ मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:31 AM2017-11-10T00:31:49+5:302017-11-10T00:31:54+5:30
जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : बुधवारी रात्री जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांना गुरुवारी पहाटे चार वाजता या मगरीचा ताबा देण्यात आला. मगरीस घेऊन शशिकांत तांबे हे पहाटे चार वाजता औरंगाबादकडे रवाना झाले, अशी माहिती पैठणचे वन्यजीव विभाग प्रमुख संंजय भिसे यांनी दिली.
बुधवारी रात्री साडेदहा वाजता जायकवाडीच्या पायथ्याशी कावसान गावाच्या रस्त्यावरुन ही मगर जाताना काही दुचाकीस्वारांना दिसली.
पैठण येथील सर्पमित्र दिलीप सोनटक्के व राजू गायकवाड यांनी साहेबा ढवळे, राजू करवंदे, शरद शिंदे, जितेंद्र अटक, स्वप्नील साळवे, गणेश पातकळ, विष्णू जगताप, आशिष मापारी, आतिष गायकवाड, जालिंदर अडसूळ यांच्या मदतीने ही ८ फूट लांबीची व दीडफूट रूंद मगर जेरबंद करून ती रात्रीच पैठण येथील वन विभागाच्या हवाली केली.
यानंतर औरंगाबाद येथील वरिष्ठ अधिका-यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार गुरुवारी ही मगर औरंगाबादेत आणण्यात आली.
परभणी जिल्ह्यातील कान्हेगाव येथे वनखात्याने पकडलेली मगर १७ सप्टेंबर २०१५ रोजी मध्यरात्री जायकवाडी प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता वन अधिका-यांनी जायकवाडी धरणाच्या अॅप्रोच कॅनॉलमध्ये आणून सोडली होती.
यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही मगर समुद्रात सोडण्यात यावी, असे पत्र जायकवाडी प्रशासनाने वन विभागास दिले होते.