पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:51 PM2020-08-28T15:51:14+5:302020-08-28T15:52:41+5:30
जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात जून ते आॅगस्ट या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सात तालुक्यांत पिकांचे किती नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. या अतिपावसाचा परिणाम मूग, उडीद व काही प्रमाणावर कापूस पिकावर झाला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांच्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक तो अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेत
नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या समितीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत. प्रत्येक पंचनामा वस्तुस्थितीदर्शक असावा. सर्व खात्री करूनच निधीची मागणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.