शेतकऱ्यांऐवजी पीकवीमा कंपन्या मालामाल; भरले ३७३ कोटी, मिळणार ४४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 08:00 PM2021-05-25T20:00:52+5:302021-05-25T20:02:04+5:30
२०२० मध्ये जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी ३ लाख ५९ हजार ७५२ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला.
- योगेश पायघन
औरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गतवर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी ३७३ कोटी ९९ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला; मात्र केवळ १ लाख ४१ हजार ९७२ शेतकऱ्यांना पीकविम्याचा ४४ कोटी चार लाख रुपयांचा लाभ मिळाल्याने पीक विम्यात शेतकऱ्यांऐवजी केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
२०२० मध्ये जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी ३ लाख ५९ हजार ७५२ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला. त्यातून १२५१ कोटी ७३ हजार ७४६ रुपयांचे विमा संरक्षण मिळविले. गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ६५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले होते; मात्र केवळ १ लाख ४१ हजार ९७२ शेतकऱ्यांना पीकविम्याचा ४४ कोटी चार लाख रुपयांचा लाभ मिळाला. लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम यायला सुरुवात झाली आहे; मात्र नुकसान लाखांत आणि मदत हजारात, अशी परिस्थिती आहे. तर काही शेतकऱ्यांना तर सातशे किंवा आठशे रुपयांचीही विम्याची मदत आली आहे.
सुमारे सात लाख शेतकरी बाद
पीकविमा भरला म्हणजे तो सर्वांनाच दिला जात नाही. पीकविमा भरलेल्यांपैकी ६ लाख ९१ हजार १३६ शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. मंडळात एकूण उंबरठा उत्पन्न अधिक असेल तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना विमा नाकारला जातो. अतिवृष्टीमुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातून ४ हजार ३३० शेतकऱ्यांनी नुकसानाच्या ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रारी केल्या. ४३३० पैकी ४२७३ तक्रारींचे सर्वेक्षण केले गेले. तर १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. अनेक वेळा तक्रारी वेळेत नसल्याने कंपन्यांकडून नुकसानाचे दावे फेटाळले जातात. अपवादात्मक परिस्थिती वगळता कंपन्यांकडून ऑफलाइन तक्रारींची दखल घेतली जात नाही.
कृषी विभागाकडे माहिती उपलब्ध नाही
वैजापूर तालुक्यातील पीक संरक्षित क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ८५ हजार ७४८ हजार हेक्टर होते. तसेच कन्नड, गंगापूर, सोयगाव तालुक्यात नुकसान अधिक झाल्याची नोंद होती. त्यामुळे लाभार्थीही याच तालुक्यातील सर्वाधिक असण्याची शक्यता आहे; मात्र कृषी अधीक्षक कार्यालयात पीकविम्याची माहिती ठेवणारे अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक डाॅ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. त्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी किती रक्कम दिली, याबद्दल माहिती मिळू शकली नाही.
खरीप हंगाम २०२०-२१
पीकविमा लागवड क्षेत्र- ३,५९,७५२.४१ हेक्टर
एकूण जमा रक्कम -३७३.९९ कोटी
शेतकरी संख्या -८,३३,१०८
विमा संरक्षित रक्कम -१२७५.०६ कोटी
एकूण मंजूर पीकविमा -४४.०४ कोटी
प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे -३८.०१ कोटी
राज्य सरकारचा हप्ता -१७० कोटी ८१ लाख ५३ हजार ६८४ रुपये
केंद्र सरकारचा हप्ता -१५९ कोटी ३३ लाख २ हजार २३३ रुपये
लाभार्थी शेतकरी -१,४१,९७२
विमा मिळालेले शेतकरी -१,४१,९७२
विमा भरुन भरपाई नाही
दरवर्षी वेळेवर पीकविमा भरतो. वस्तुस्थितीनुसार झालेल्या नुकसानाचा मोबदला आतापर्यंत मिळाला नाही. नुकसान लाखांत असते, तर मोबदल्याची रक्कम कागदोपत्री अर्ज आणि पाठपुरावा करण्याइतपतही मिळत नाही.
- प्रकाश आगे, शेतकरी.
पीकविमा काढून उपयोग काय?
अतिवृष्टीत पूर्ण शेतीचे नुकसान झाले. पीकविमा भरला होता; मात्र खरीप हंगामातील पीकविम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे पीकविमा काढून उपयोग काय, असाही प्रश्न पडतो.
- कैलास पंडित, शेतकरी.
विमा नाकारण्यात आला
अतिवृष्टीत नर्सरीसह खरीप पिकांचे नुकसान झाले; मात्र मंडळातील उंबरठा उत्पादन अधिक असल्याने यावेळी विमा नाकारण्यात आला. वस्तूस्थितीचा पंचनामा करून पीकविमा दिला गेला पाहिजे. केवळ कागदोपत्री नियमांवरून विमा नाकारणे योग्य नाही.
-हर्षल राऊत