पीक विमा मंजुरीत गंगापूर तालुक्याला वगळले; शेतकऱ्यांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:04 AM2021-05-27T04:04:42+5:302021-05-27T04:04:42+5:30
प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेंतर्गत सन-२०२०च्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापसासह, तूर, कांदा, उडीद, मुगाचा पीक विमा भरला होता. गेल्या ...
प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेंतर्गत सन-२०२०च्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापसासह, तूर, कांदा, उडीद, मुगाचा पीक विमा भरला होता. गेल्या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच जोर कायम ठेवल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये कापूस व कांद्याची नासाडी झाली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी पिकविम्याची रक्कम मिळणे अपेक्षित असताना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आहेत. विमा मंजूर करताना पीक कापणी प्रयोग, उंबरठा उत्पन्न, तसेच अतिवृष्टीच्या नोंदीचा अभ्यास करून पीक विमा मंजूर केला जातो. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या नियमांचा विचार झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. कोरोनासारख्या महामारीत अनेकांचे रोजगार बुडाले असून, शेतकऱ्यांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पीक विमा मंजूर करताना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांसाठी पीक विमा मंजूर झाला. मात्र, केवळ गंगापूर तालुक्यावर अन्याय झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.