मराठवाड्यातील पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा झाला चिखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:01 PM2022-07-22T12:01:19+5:302022-07-22T12:02:12+5:30
मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे; ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे नुकसान
औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. १ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून, पावणेतीन लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. २३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे जुलै महिन्यातील पावसाने नुकसान केले आहे. यातील १ लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.
मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ३५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७५ हजार ९१३, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४० हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४२० मि.मी. पाऊस झाला आहे. २५४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६६ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६१ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ३९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान
नांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील ८४ हजार ६९०, तर लातूरमधील ७७३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे.
सर्व प्रकल्पांत ७३ टक्के पाणी
विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७३.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८३ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६३, सिध्देश्वर ५०, माजलगाव ३९, मांजरा ३४, पैनगंगा ८२, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६०, विष्णुपरी ६८, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.