पावसाच्या दडीमुळे जिल्हाभरातील पिके सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:04 AM2021-07-07T04:04:26+5:302021-07-07T04:04:26+5:30

पैठणमधील ५७ हजार ९२५ हेक्टरवरील पिके धोक्यात तालुक्यात ८४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने जवळपास ५७ हजार ...

Crops on saline in the district due to heavy rains | पावसाच्या दडीमुळे जिल्हाभरातील पिके सलाईनवर

पावसाच्या दडीमुळे जिल्हाभरातील पिके सलाईनवर

googlenewsNext

पैठणमधील ५७ हजार ९२५ हेक्टरवरील पिके धोक्यात

तालुक्यात ८४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने जवळपास ५७ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रातील पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. आजच्या तारखेपर्यंत यंदा सरासरी ११४. ७० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेला सरासरी २६५.९० मि.मी. पाऊस पडला होता.

सिल्लोड तालुक्यात ८२ टक्के पेरणी

तालुक्यातील ९८ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रापैकी ८३ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या, याचे सरासरी प्रमाण ८२ टक्के आहे. मात्र, काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते पिकांना पाणी देऊन वाचवित आहेत. मात्र इतर शेतकरी दुबार पेरणीच्या सावटाखाली आहेत.

फुलंब्रीत आतापर्यंत १२५ मि.मी. पाऊस

फुलंब्री तालुक्यात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या जाेरावर बहुतांश पेरणी आटोपली आहे. पिकांची स्थिती आज जरी व्यवस्थित दिसत असली, तरी येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत तालुक्यात २९० मि.मी. पाऊस पडला होता, तर यंदा केवळ १२५ मि.मी. पाऊस झाला आहे.

कन्नडमधील ६४ हजार १७७ हेक्टरवरील पेरणी धोक्यात

कन्नड तालुक्यात आतापर्यंत १८० मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत हेच प्रमाण २७६ मि.मी. इतके होते.

खरिपाच्या ९३ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात कापूस व मक्याची लागवड जास्त आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे.

खुलताबादेत आजपर्यंत १३२.६६ मि.मी. पाऊस

खुलताबाद तालुक्यात गतवर्षी या तारखेपर्यंत ३३२.७७ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा मात्र पावसाने हात अखडता घेतला असून आतापर्यंत १३२.६६ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने कोवळी पिके करपत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

औरंगाबादेतील पिकांना आठ दिवसांपूर्वीच्या पावसाने वाचविले

औरंगाबाद तालुक्यात मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी अटोपती घेतली. त्यानंतर पावसाने दीर्घ दडी दिली. मात्र आठ दिवसांपूर्वी काही भागात झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट कोसळणार आहे.

सोयगाव तालुक्यात मका पिकांना उन्हाचा फटका

तालुक्यात पावसाच्या ओढीचा सर्वात मोठा फटका मका पिकांना बसला आहे. तालुक्यात ३८ हजार ६८० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. यात २९ हजार ३९१ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. यातील १२ हजार ९६५ हेक्टरवरील कोरडवाहू कपाशी पिके धोक्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत १४१.८ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी हे प्रमाण १२२.२ इतके होते.

वैजापूर तालुक्यात सरासरी १०२. ६ मि. मी. पाऊस

वैजापूर तालुक्यात दीर्घ काळापासून पावसाने दडी मारली असून शेतपिके करपायला सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस न झाल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १०२.६ मि. मी. पाऊस झाला. गतवर्षी हे प्रमाण २६६.१ मि.मी. एवढे होते.

गंगापुरात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

गंगापूर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १२१ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण २५६ मि.मी. एवढे मोठे होते.

Web Title: Crops on saline in the district due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.