पावसाने ओढ दिल्याने पिकांनी टाकल्या माना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 09:43 PM2019-08-27T21:43:47+5:302019-08-27T21:43:52+5:30
२० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.
पिंप्री राजा : औरंगाबाद तालुक्यात यंदा एकही मोठा पाऊस पडलेला नाही. त्यातच २० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.
राज्याच्या इतर भागात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झालेले असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळी स्थिती आहे. पिंप्री राजा परिसरात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यातच २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने थोड्याफार पावसावर तग धरून असलेल्या मका ,बाजरी,सोयाबीन या पिकांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. पूर्ण पिकांनी माना टाकल्याचे चित्र आहे.
कापूस, तूर हे पिक तग धरून आहे. पण त्या पिकांचीही वाढ खुंटलेली आहे. आता पाऊस जरी आला तरी या कापूस व तूर पिकांचा फक्त खर्चच मिळणार आहे. या परिस्थितीमुळे सततच्या दुष्काळाने हैराण असलेले शेतकरी आता आणखीनच हवालदील झाले आहेत.
कारण आता पिकांचा पूर्ण खर्च जवळपास झालेला आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी आता या आस्मानी संकटाने कोलडून पडला आह. शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.