पिकांना जीवदान मिळणार; जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून खरीप संरक्षित पाळी सोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:12 PM2023-09-01T20:12:19+5:302023-09-01T20:12:50+5:30
लाभक्षेत्रातील ३८६ गावातील शेतकऱ्यांना दिलासा!
पैठण: पावसाने गेल्या अनेक दिवसापासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी ( दि. १) दुपारी १०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला. हळूहळू विसर्गात वाढ करण्यात येणार असून २५ दिवस खरीप संरक्षित आवर्तन सुरू राहणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. खरीपासाठी पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जायकवाडी धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी खरीप पिके वाचवण्यासाठी जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी केली होती. दरम्यान पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खरीप हंगामासाठी पाणीपाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयानुसार शुक्रवारी डाव्या कालव्यातून दुपारी दोन वाजता १०० क्युसेक्सने विसर्ग प्रारंभ करण्यात आला. विसर्ग हळूहळू वाढवून १००० क्युसेक्स पर्यंत करण्यात येणार आहे. पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावातील १८३३२२ हेक्टर क्षेत्रातील खरिप पिकांना पाण्याची गरज होती, धरणातून आवर्तन मिळालज नसते तर पिके हातातून जाण्याची धोकादायक परिस्थिती उदभवली होती.
धरणात सध्या ३३% जलसाठा उपलब्ध असल्याने खरिप पिका साठी एक आवर्तन सोडण्यात यावे अशी जोरदार मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. डावा कालव्यावर १४१६४० हे. सिंचन जायकवाडी धरणाच्या २०८ कि मी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १४१६४० हे. क्षेत्र सिंचना खाली येते यात औरंगाबाद - ७६२० हे, जालना - ३६५८० हे, परभणी - ९७४४० हेक्टर क्षेत्र येते या क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली असून पावसाने दडी मारल्याने पाण्या अभावी पिके धोक्यात आली आहेत.
उजव्या कालव्यातूनही पाणी सोडा
उजव्या कालव्यावर ४१६८२ हे क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि मी लांबीचा आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यात औरंगाबाद - १४३२ हे, बीड - ३७९६० हे, व अहमदनगर - २२९० हे क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे या पिकांनाही पाण्याची गरज आहे यामुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पैठण तालुक्यातील ९०५२ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांना फायदा....
पैठण तालुक्यात डाव्या कालव्यावर ७६२० हे क्षेत्र व उजव्या कालव्यावर १४३२ हे. क्षेत्रातील २८ गावात खरिपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे पावसाने दडी मारल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खेर्डा प्रकल्पासहीत आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा. तालुक्यातील खेर्डा प्रकल्प कोरडा पडला आहे. ब्रम्हगव्हान सिंचन योजनेतून खेर्डा प्रकल्पात पाणी सोडावे तसेच आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांनी केली आहे.