बनावट कंपनी स्थापन करून उचलले कोट्यवधींचे कर्ज, जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट सही, शिक्के वापरले
By राम शिनगारे | Published: February 3, 2023 07:55 PM2023-02-03T19:55:48+5:302023-02-03T19:56:02+5:30
सिटी चौक पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीतील एक कंपनी ३ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केल्याचे बनावट कागदपत्रे तयार केली. त्यासाठी जिल्हाधिकारी यांचा बनावट सही व शिक्का मारून १२ लाख ६० हजार ७०० रुपये स्टॅम्प ड्यूटी भरल्याचे दाखविले. त्यानंतर हस्तांतरित बनावट कंपनीच्या नावाने विविध बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. सिटी चौक पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
परमेश्वर सूर्यभान नाझरकर, उज्ज्वला परमेश्वर नाझरकर (दोघे, रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना), संदीप मनसब गवळी (रा. घाणेगाव, ता. गंगापूर) आणि परमेश्वर चाँदराव वट्टवाड (रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) या चार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ॲड. सुशील बियाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी वाळूज येथे जोसेल गणा दुराई यांच्या मालकीची ड्युरोसिट्स ही कंपनी दहा हजार चौरस फुटांच्या प्लॉट नंबर के. २३९ वर कार्यरत आहे. आरोपी नाझरकर दाम्पत्याने मात्र ‘ड्युरोसिट्स’ पुढे ‘इंडस्ट्रीज’ हे शब्द जोडून बनावट कंपनी स्थापन केली.
या कंपनीने दुराई यांच्या मालकीची कंपनी ३ कोटी १० लाख रुपयांत हस्तांतरित केल्याचे एमआयडीसीचे बनावट हस्तांतरण आदेश ४ ऑगस्ट २०१५ रोजी तयार केले. हा आदेश डीड ऑफ असायनमेंटमध्ये जोडला. त्यानंतर मूळ मालक दुराई यांच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून त्याचे बनावट ओळखपत्र तयार केले. गंगापूर येथील मुद्रांक शुल्क नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून एमआयडीसीच्या बनावट हस्तांतरण आदेशाद्वारे बनावट डीड ऑफ असायनमेंट ५ सप्टेंबर २०१५ रोजी करून घेतले.
या नोंदणीसाठी लागणारे १२ लाख ६० हजार ७०० रुपये स्टॅम्प ड्यूटी भरल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी मुद्रांक शुल्क, जिल्हाधिकारी यांचा बनावट शिक्का तयार करून बनावट सही केल्याचेही उघडकीस आले. या प्रकरणात ॲड. बियाणी यांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात फसवणुकीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.