लाडसावंगीत मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:05 AM2021-01-18T04:05:06+5:302021-01-18T04:05:06+5:30
लाडसावंगी गावातून चौका, राजूर, सिल्लोड, पैठण, भोकरदन हे तीन राज्य महामार्ग जातात. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र मुख्य ...
लाडसावंगी गावातून चौका, राजूर, सिल्लोड, पैठण, भोकरदन हे तीन राज्य महामार्ग जातात. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र मुख्य रस्त्यावरील दुकानदार दुकानासमोर साहित्य ठेवतात. त्यानंतर तेथे ग्राहकही आपली वाहने लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागा (उत्तर)ने अतिक्रमण धारकांना पंधरा दिवसांची मुदत देऊनही अतिक्रमण निघाले नाही. यानंतर विभागानेही कारवाई केली नाही. शिवाय लाडसावंगी येथील मुख्य बाजारपेठेत व महामार्गावर एका बाजूने देशी व दुसऱ्या बाजूने विदेशी दारुचे दुकाने असल्याने ऐन सायंकाळच्या वेळी तेथे मोठी गर्दी होते. त्यामुळे वरिष्ठांनी दखल घेऊन रस्त्यावर असलेले अतिक्रमण तत्काळ काढण्याची मागणी वाहन धारकांनी केली आहे.
फोटो : लाडसावंगी येथे रस्त्यावर झालेली गर्दी.