‘द्रौपदी स्वयंवर’ला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:14 AM2017-09-03T00:14:15+5:302017-09-03T00:14:15+5:30
सजीव देखाव्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळाने यंदा ‘द्रौपदी स्वयंवर’चा देखावा तयार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सजीव देखाव्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळाने यंदा ‘द्रौपदी स्वयंवर’चा देखावा तयार केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी संपूर्ण शहरातून आबालवृद्धांची गर्दी होत आहे.
सावता गणेश मंडळाची स्थापना १९८४ साली झाली. तेव्हापासून मंडळाने सजीव देखाव्याची परंपरा कायम जपली आहे. ५० पेक्षा अधिक कलाकारांचा समावेश व धार्मिक कथेवर आधारित भव्य देखावे हे या मंडळाचे वैशिष्ट्य ठरत आहे. यंदा शुक्रवारपासून या मंडळाने ‘द्रौपदी स्वयंवर’चा देखावा सुरू केला आहे. यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. राजा द्रुपद यांचा दरबार तयार करण्यात आला आहे. त्यांची कन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरासाठी देश-विदेशातील महाराजे तेथे विराजमान झाले आहेत. पाण्यात प्रतिबिंब पाहून छताला फिरत असलेल्या माशाच्या डोळ्यात धनुष्यबाण मारण्यास जो यशस्वी होईल त्या राजासोबत द्रौपदीचा विवाह लावण्यात येणार असतो. एकानंतर एक बलाढ्य महाराजे धनुष्य उचलू शकत नाहीत. दुर्योधनाची वेळ येते तेव्हा तो कर्णाला पुढे करतो; पण द्रौपदी त्यास नकार देते. तेथे ब्राह्मणाच्या वेशभूषेत आलेल्या पांडवातून अर्जुन पुढे जातो व तो धनुष्यबाण उचलून लक्ष साधतो. द्रौपदी अर्जुनाच्या गळ्यात वरमाळा घालते.