मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 11:40 AM2022-06-14T11:40:56+5:302022-06-14T11:41:25+5:30
मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे.
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने मागील वर्षी दोन सीबीएसई शाळा सुरू केल्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी ३ शाळा सुरू करण्याचा निर्णय मागील आठवड्यात झाला. सोमवारी प्रवेशासाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली. पहिल्याच दिवशी ३९० पालकांनी अर्ज घेतले. मंगळवारीही अर्ज वाटप सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.
मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे. खासगी शाळांमध्ये हजारो रुपये भरून पाल्यांना प्रवेश द्यावा लागतोय. गोरगरीब विद्यार्थ्यांनाही सीबीएसईच्या दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून मनपाने पुढाकार घेतला. प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रायोगिक तत्त्वावर मागील वर्षी दोन शाळा सुरू केल्या. दोन्ही शाळांना पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. पालकांचा उत्साह लक्षात घेऊन यंदा पुन्हा तीन शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ज्यु. केजी आणि सिनिअर केजीसाठी अर्ज वाटप करण्यात आले. एकूण पाच शाळांत ३९० अर्ज वाटप करण्यात आले.
३० कोटींचा खर्च
शहरात महापालिकेच्या ७० शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थी संख्या दरवर्षी झपाट्याने खालावत आहे. शैक्षणिक गुणवत्ता नसल्याने आणि सोयी सुविधांचा अभाव असल्याने अनेक गरीब पालकही ‘मनपा शाळा नको’ म्हणतात. त्यामुळे मनपाने स्मार्ट सिटीमार्फत सर्व शाळांचे अद्ययावतीकरण, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ३० कोटींची तरतूद केली. काही शाळांमध्ये डागडुजी सुरू करण्यात आली.
दिल्लीसारख्या शाळा
आम आदमी पक्षाने दिल्लीत शाळांचा दर्जा उंचावला. मनपा अधिकाऱ्यांच्या पथकाने अलीकडेच दिल्ली येथील शाळांची पाहणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला. दिल्ली मॉडेल आत्मसात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
कोणत्या शाळेत किती अर्ज वाटप ?
शाळा- अर्ज वितरण संख्या
प्रियदर्शनी विद्यालय - ८५
गारखेडा शाळा - ६०
उस्मानपुरा शाळा - ६१
चेलीपुरा शाळा - ६५
सिडको एन-७ - ११९
एकूण - ३९०