मामांच्या भेटीला सखींची गर्दी

By Admin | Published: July 15, 2017 12:50 AM2017-07-15T00:50:50+5:302017-07-15T00:54:27+5:30

औरंगाबाद : मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, सर्वांचे लाडके ‘मामा’ अर्थातच अशोक सराफ यांचा प्रवेश होताच सभागृह जणू सखींच्या हर्षोल्हासाने प्रफुल्लित होऊन गेले.

The crowd gathered in front of Mama | मामांच्या भेटीला सखींची गर्दी

मामांच्या भेटीला सखींची गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, सर्वांचे लाडके ‘मामा’ अर्थातच अशोक सराफ यांचा प्रवेश होताच सभागृह जणू सखींच्या हर्षोल्हासाने प्रफुल्लित होऊन गेले. अचूक टायमिंगद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अशोक सराफ यांना भेटण्यासाठी सखींनी केलेली तुफान गर्दी खरोखरच ‘शेंटिमेंटल’ करणारी ठरली. औचित्य होते सखी मंच आयोजित ‘गप्पा-टप्पा’ या कार्यक्रमाचे. यावेळी ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाची संपूर्ण टीमच सखींशी संवाद साधण्यासाठी आली होती.
शुक्र वारी सायंकाळी लोकमत हॉल येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अशोक सराफ यांच्यासह ‘शेंटिमेंटल’ चित्रपटाचे लेखक तथा दिग्दर्शक समीर पाटील, अभिनेता विकास पाटील, अभिनेत्री पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रमेश वाणी, अंबरीश दरक आदींची उपस्थिती होती. अशोक सराफ, लोकमतचे संपादक सुधीर महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गप्पा-टप्पांना सुरुवात करण्यात आली. सारंग टाकळकर यांनी कलाकारांशी संवाद साधून ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाविषयी जाणून घेतले.
प्रदीर्घ कालावधीनंतर या चित्रपटातून अशोक सराफ हे प्रल्हाद घोडके या हवालदाराच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याविषयी सांगताना ते म्हणाले की, हा हवालदार ‘पांडू’ हवालदारापेक्षा संपूर्णपणे वेगळा आहे. पोलिसांचे जीवन अत्यंत खडतर असते. वेळेचे कोणतेही बंधन नसल्यामुळे संसार, मुले यांच्याकडे लक्ष देणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे अनेकदा पोलीस खात्यातील लोक वेगवेगळ्या गोष्टींकडे नाइलाजाने वळतात; परंतु प्रल्हाद हवालदार हा स्वभावाने अत्यंत मृदू असून, लोकांवर उपकार करणारा आहे. चित्रीकरणादरम्यानचे अनुभव सांगताना ते म्हणाले की, अहंगंड नसणारी माणसे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे चित्रीकरण कधी पूर्ण झाले ते समजलेच नाही.
‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’ या हीट चित्रपटांनंतर ‘शेंटिमेंटल’चे दिग्दर्शन करणारे समीर पाटील म्हणाले की, हा पोलिसांमधल्या माणसांची गोष्ट सांगणारा, पोलीस व सामान्य माणूस यांच्यातली दरी कमी करणारा चित्रपट आहे. विषय अत्यंत गंभीर असला तरीही त्यावर अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीने भाष्य करून अंतर्मुख व्हायला लावणारा हा चित्रपट आहे. भूमिका लिहिताना हवालदाराच्या भूमिकेसाठी फक्त आणि फक्त मामाच डोळ्यासमोर होते; पण त्यांना भूमिकेसाठी विचारणे मोठे धाडसाचे वाटत होते, असेही पाटील यांनी सांगितले.
अभिनेता विकास पाटील हा या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, तर अभिनेत्री पल्लवी पाटील पोलीस उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे. या दोघांची फुलत जाणारी पे्रमकथा पडद्यावर पाहणे रंजक ठरणार असल्याचे या दोघांनी सांगितले. याशिवाय सुयोग गोऱ्हे, रमेश वाणी यांनीही चित्रपटातील आपापल्या भूमिकांविषयी माहिती दिली. या कलाकारांसोबतच उपेंद्र लिमये, रघुबीर यादव, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट दि. २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खुसखुशीत संवाद, ठेका धरायला लावणारी गाणी या चित्रपटाचा आत्मा असून दासू वैद्य, गुरू ठाकूर यांनी लिहिलेली गाणी मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केली आहेत.

Web Title: The crowd gathered in front of Mama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.