मोलकरणींच्या नोंदणीसाठी गर्दी
By Admin | Published: August 27, 2014 01:12 AM2014-08-27T01:12:35+5:302014-08-27T01:36:00+5:30
जालना : येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात मोलकरीण व बांधकाम मजुरांची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गर्दी आटोक्यात आणण्यासाठी
जालना : येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात मोलकरीण व बांधकाम मजुरांची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस संरक्षण घेण्याची वेळ आली आहे.
जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे कामकाज गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाले आहे. सोमवारी तर पोलिस संरक्षण घेऊन कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. मंगळवारी खाजगी सुरक्षा रक्षक नेमून कामकाज करावे लागले. यात बोगस कामगार व मजुरांचा भरणा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी मोलकरणीसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांमध्ये काही जणांची नोंदणी बोगस असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा पार बोजवारा होण्याची भिती निर्माण झाली आहे. शहरी भागात कामासाठी मजुर मिळत नाही. मात्र नोंदणीसाठी एकाचवेळी सुमारे दोन ते तीन हजार मजूर हजर झाल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. ठेकेदारांकडे अधिकृत नोंदणी परवाना नसतानाही लोकांकडून केवळ ठसा मारून सही देण्यासाठी पैसे उकळण्याचा प्रकार होत असल्याच्याही तक्रारी आहेत.
आयटक कामगार संघटनेचे देवीदास जिगे यांनी सांगितले, आपण गेल्या सहा वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र ऐनवेळी बोगस मजुरांची संख्या वाढल्याने मूळ व गरजू लाभार्थी वंचित राहत आहेत. त्यासाठी शासनाने बोगस लाभार्थींची चौकशी करून मगच नोंदणी करावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)