औरंगाबाद जिल्ह्यात पाहुण्यांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:41 AM2017-12-25T00:41:40+5:302017-12-25T00:43:06+5:30
नाताळ सणाला लागून सलग तीन दिवस सुट्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही नाताळनिमित्त दहा दिवसांच्या सुट्या जाहीर केल्याने रविवारी पर्यटनाची राजधानी औरंगाबाद पाहुण्यांनी गजबजली होती.
औरंगाबाद/ खुलताबाद/फर्दापूर : नाताळ सणाला लागून सलग तीन दिवस सुट्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही नाताळनिमित्त दहा दिवसांच्या सुट्या जाहीर केल्याने रविवारी पर्यटनाची राजधानी औरंगाबाद पाहुण्यांनी गजबजली होती. ऐतिहासिक बीबीका मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यानात पाय ठेवण्यालाही जागा नव्हती. अजिंठा, वेरूळ लेणीसह खुलताबाद, दौलताबादेत पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे. त्यात शैक्षणिक सहलीही मोठ्या प्रमाणात आल्याने सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल झाली आहेत. पर्यटकांसोबतच स्वाध्याय परिवारातर्फे सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामुळे शहरातील रस्ते दिवसभर गर्दीने फुलले होते. त्याचप्रमाणे विविध संस्था, संघटनांतर्फेही कार्यक्रमांचे आयोजन केल्याने शहरात पाहुण्यांच्या गर्दीत आणखी भर पडली होती.
रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर अलोट गर्दी पहावयास मिळाली. वेरूळ येथे सकाळपासूनच लेणी बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याने तिकीट घरावर एकाच वेळी हजार-पाचशे पर्यटकांची तोबा गर्दी बघावयास मिळाली.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता तिकिटाचे काऊंटर वाढविणे गरजेचे होते; परंतु पुरातत्व विभागाने तसे न केल्याने पर्यटकांचे हाल झाले. पर्यटकांच्या गर्दीने वाहनतळावर वाहने लावण्यास जागा मिळत नसल्याने अनेकांनी चक्क रस्त्यावर वाहने उभी केली होती. त्याचबरोबर वाहनांच्या गर्दीने लेणीसमोर तसेच खुलताबाद-दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम होण्याचा प्रकार सतत घडत होता. त्यामुळे पर्यटक व भाविकांची प्रचंड गैरसोय झाली.
पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक व्यावसायिक आनंदी होते. लॉज, हॉटेल हाऊसफुल झाले आहेत. दौलताबाद किल्ला, भद्रा मारुती मंदिर, घृष्णेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने वेरूळला सोमवारी मोठी गर्दी होण्याचा अंदाज येथील व्यावसायिकांनी लावला आहे. शैक्षणिक सहलीच्या एस. टी. बसेस लेणी परिसरात सोडण्यात याव्यात, अशी मागणी वेरूळचे माजी सरपंच नाना ठाकरे यांनी केली आहे.
एस. टी. बसेस रस्त्यावर उभ्या करून विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करून जावे लागत असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शैक्षणिक सहलीच्या बसेस वेरूळ लेणीत सोडण्याची मागणी होत आहे. गर्दीचा आज पहिलाच दिवस होता. अजून चार दिवस पर्यटकांची गर्दी राहणार असल्याने एस. टी. महामंडळ व एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालून अजिंठा लेणीतील नियोजनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.
अजिंठा लेणीत ‘अतिथी देवो भव’ला हरताळ
अजिंठा लेणीत एस. टी. महामंडळ व एमटीडीसीच्या गलथान कारभाराचा अनुभव आज पुन्हा पर्यटकांना आला. गर्दी वाढली की पर्यटकांची गैरसोय ठरलेलीच आहे. अनेक पर्यटकांना अजिंठा लेणी दर्शन न घेता परत फिरावे लागले.
४वाहनतळावर जागा नसल्याने जळगाव-औरंगाबाद महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºयांचेही हाल झाले.
अजिंठा लेणीत जाण्यासाठी टी पॉइंटवरून प्रदूषणमुक्त बसमधून जावे लागते. या बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पर्यटकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागले. पर्यटकांची गर्दी होणार, हे लक्षात घेऊन येथील पोलीस अधिकाºयांनी एस. टी. महामंडळाला आधीच बससंख्या वाढविण्यासंदर्भात पत्र दिले होते; परंतु एस. टी. महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पर्यटकांना दिवसभर हाल सहन करावे लागले.
४काही पर्यटक बैलगाडीतून लेणीत गेले. काही पायी गेले व काही पर्यटक लेणी न बघताच परत फिरल्याने ‘अतिथी देवो भव’ला हरताळ फासला गेला. येथील व्हिजिटर सेंटरसुद्धा बंद असल्याने पार्किंगची व्यवस्था होऊ शकली नाही. पोलीस निरीक्षक शरद जºहाड, पोकॉ. राजू काकडे, मेढे, भिवसने यांनी वाहतूक सुरळीत केली.