म्हैसमाळयेथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:59 PM2019-07-02T16:59:08+5:302019-07-02T17:03:48+5:30
खुलताबाद - म्हैसमाळ रस्त्याचे काम अर्धवटस्थितीत असल्याने अपघात वाढले आहेत
खुलताबाद (औरंगाबाद ) : मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण व प्रसिध्द पर्यटनस्थऴ म्हैसमाऴ येथे दिवसेंदिवस पर्यटकांची मोठी गर्दी होत असून शनिवार व रविवारी तर यात्रेचे स्वरूप येत आहे. येथे औरंगाबाद शहर परिसरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, या ठिकाणी रस्ता, स्वच्छता गृह, सुरक्षा कठडे आदी सोयी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांत नाराजी आहे.
मिनी महाबळेश्वर म्हणून ओऴखले जाणाऱ्या व निसर्ग सौदंर्यानी नटलेल्या म्हैसमाळ पर्यटनस्थऴी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अनेकजण येथे कुटुंबासह येतात. म्हैसमाऴ घाटातील नागमोडी रस्ता, म्हैसमाऴ येथील व्हूपॉईंटवरून दिसणारे निसर्गसौंदर्य, घनदाट झाडी, रिमझिम पाऊस सर्वत्र पडणारे धुके, या धुक्यातून वाट काढत जंगलपरिसरात फिरण्याची मजा काही औरच असते. त्यातच गरमागरम भजे, मक्याचे कणीस , शेंगा खात पर्यटक येथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत. येथे दर शनिवार व रविवारी जवऴपास दहा हजाराच्या आसपास पर्यटक भेट देत आहेत. तलाव, टि.व्ही सेंटर, व्हयूपॉईंट, बालाजी मंदीर, गिरिजादेवी मंदीर आदी ठिकाणी भेट देण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे.
खराब रस्त्याने अपघात
खुलताबाद - म्हैसमाळ रस्त्याचे काम अर्धवटस्थितीत असल्याने चिखलाने वाहने घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच येथे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.