दुस-या दिवशीही पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:42 AM2017-12-26T00:42:49+5:302017-12-26T00:42:57+5:30
खुलताबाद/वेरुळ/फर्दापूर : नाताळाच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील पर्यटनसस्थळांवर सलग दुस-या दिवशीही तोबा गर्दी झाली होती. वेरूळ लेणीत पुरातत्व विभागाने कुठलेही नियोजन ...
खुलताबाद/वेरुळ/फर्दापूर : नाताळाच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील पर्यटनसस्थळांवर सलग दुस-या दिवशीही तोबा गर्दी झाली होती. वेरूळ लेणीत पुरातत्व विभागाने कुठलेही नियोजन न केल्याने पर्यटकांचे मोठे हाल झाले.
तिकिट घेण्यासाठी दोन दोन तास उभे राहावे लागत असल्याचे पाहून अखेर अनेक पर्यटक लेणी न पाहताच माघारी फिरले. सोमवारी अजिंठा लेणी बंद असते, हे सर्व माहित असूनही पुरातत्व विभागाने जास्तीचे तिकिट काऊंटर उघडले नाही. दुपारी एक वाजेपर्यंत तर तिकिट खरेदीच्या रांगा थेट मुख्य प्रवेशद्वारासमोरील सोलापूर -धुळे मार्गावर आल्या तरी जास्तीचे काऊंटर उघडले नाही. ट्रॅफीक जाममुळे पर्यटकांची वाहतूक करणारी बससेवाही कोलमडली होती. पर्यटक पायीच वेरूळ लेणी परिसरात जात होते.
पर्यटकांची तिकिट खरेदीसाठी झालेली गर्दी पाहून सहलीतील विद्यार्थ्यांनी बाजूलाच उभे राहणे पसंत केले. पर्यटकांची गर्दी पाहून पुरातत्व विभागाचे अधिकारी हतबल झाले होते.
जागा कमी पडत असल्याने वन विभागाच्या उद्यान परिसरात वाहने उभी करावी लागली. काही पर्यटकांनी वाहने खुलताबाद घाटात उभी केल्याने ट्रॅफीक जाम होत होती. हॉटेल, दुकाने, लॉज रात्रीपासून हाऊसफुल्ल झाल्याने रूमचे दर दाम दुपटीने वाढविल्याचे पर्यटकांनी सांगितले. गर्दीमुळे लेणी दोन दिवसांपासून सात वाजेपर्यंत उघडी राहात आहे.
घृष्णेश्वर मंदिरातही यामुळे गर्दी वाढली आहे. तसेच सोमवारी अजिंठा लेणी बंद असली तरी हजारो पर्यटक बाहेरुनच लेणी पाहून परत गेले.