मोबाईल हिसकावणाऱ्या दुचाकीस्वार भामट्यांना जमावाचा चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:12+5:302021-09-21T04:04:12+5:30
वाळूज महानगर : मोबाईलवरून संभाषण करीत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावून जाणाऱ्या दुचाकीस्वार दोघा भामट्यांना पकडून जमावाने चोप दिल्याची घटना ...
वाळूज महानगर : मोबाईलवरून संभाषण करीत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावून जाणाऱ्या दुचाकीस्वार दोघा भामट्यांना पकडून जमावाने चोप दिल्याची घटना रविवारी रात्री बजाजनगरात घडली. त्यानंतर या दोघा भामट्यांना नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
विशाल बाळासाहेब उदार (वय २६, रा. बजाजनगर) हा तरुण रविवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास मोहटादेवी मंदिर ते हायटेक या रस्त्यावरून मोबाईलवर संभाषण करीत चालला होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वार दोन भामट्यांनी विशालचा मोबाईल हिसकावला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विशाल उदार याने मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी या भामट्यांची दुचाकी अडवून त्यांना पकडले. या दोघांनी मोबाईल हिसकावल्याचे लक्षात येताच जमावाने या दोघा भामट्यांना चांगलाच चोप देत या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी या दोघा भामट्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मदन प्रकाश दूधमोगरे (२१, रा. रांजणगाव) व लखन गजानन ढोके (१९, रा. कमळापूर) असल्याचे सांगितले. या दोघा दुचाकीस्वार भामट्यांच्या ताब्यातून विशाल उदार यांचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.