रेल्वेस्थानकावर काळीपिवळीसारखी प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:03 AM2021-09-18T04:03:27+5:302021-09-18T04:03:27+5:30
सणांमुळे कुटुंबे प्रवासाला : स्थानकावर खबरदारीसाठी अधिकाऱ्यांची टीम - साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनामुळे अनेक रेल्वे गाड्या थांबविलेल्या होत्या, ...
सणांमुळे कुटुंबे प्रवासाला : स्थानकावर खबरदारीसाठी अधिकाऱ्यांची टीम
- साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : कोरोनामुळे अनेक रेल्वे गाड्या थांबविलेल्या होत्या, तर काही पॅसेंजर गाड्या विशेष रेल्वेच्या नावाने अलीकडे सुरू करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या भीतीने थांबलेली प्रवाशांची गर्दी पुन्हा वाढलेली दिसत आहे. प्रवासाला निघालेली अनेक कुटुंबे स्थानकावर दिसत आहेत. त्यामुळे जाणाऱ्या तसेच येणाऱ्या सर्वच गाड्या हाऊसफुल झाल्या आहेत.
गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची मालिका सुरू होत आहे. तथापि, मागील १७ महिन्यांपासून नागरिकांना गंभीर परिस्थितीतून जावे लागत आहे. अनेकांना नोकऱ्या सोडून घरीच थांबावे लागले. या सर्व गुंतागुंतीतून अखेर मोकळा श्वास घेण्यासाठी नागरिक बाहेर पडले आहेत. दैनंदिन जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आलेले दिसत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका थोडा टळलेला असला तरी आरोग्याबाबत खबरदारी बाळगली जात आहे.
सर्व गाड्यांत स्थिती सारखीच
१) मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस, विशेष रेल्वेसह काही गाड्यांना प्रवाशांची अधिक गर्दी जाणवत आहे.
२) लागून आलेल्या सुट्यांमुळे अनेक कामगार व नागरिकांनी गावी जाण्याचा बेत रचलेला दिसत आहे.
३) प्रवाशांना रेल्वेचे तिकीट खिडकीवर नव्हे, तर आजही ऑनलाइनच तिकीट काढावे लागत आहे. फक्त प्लॅटफार्मचे तिकीट स्थानकावर काढता येते.
विक्रेत्यांची गर्दी जास्त
रेल्वेस्थानकावर प्रवासी संख्या वाढल्याने खाद्यपदार्थांचे विविध स्टॉलही सुरू झालेले आहेत. प्रवाशांना पाणी, खाद्यपदार्थ घेण्यासाठी स्थानकाबाहेर जावे लागते. त्यादरम्यान गाडी सुटल्यास गैरसोयीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रवाशी देखील गरज पडल्यास स्थानकातच खाद्यपदार्थ खरेदी करताना दिसत आहेत.
उत्सवामुळे सर्वच गाड्या हाऊसफुल
प्रवाशांनी रेल्वेला प्राधान्य दिलेले आहे. ऑनलाइन तिकीट काढूनच प्रवाशी घराबाहेर पडलेले आहेत. पॅसेंजर रेल्वे वगळता सर्वच गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. डेमो आणि हैद्राबाद विशेष रेल्वेला स्थानकांवर तिकीट काढता येते. रेल्वे प्रवाशांत अधिक वाढ झाल्यामुळे तिकीटविक्री टाळता येत नाही. मात्र, रेल्वेच्या वतीने खबरदारी बाळगली जात आहे.
- रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी.
कॅप्शन.... रेल्वेस्थानकावर प्रवाशांची अशी तोबा गर्दी दिसत आहेत. प्रवाशांची तिकिटे पाहूनच स्थानकात प्रवेश दिला जात आहे.