मनपाच्या तिजोरीत खडखडाट; पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपयेही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:22 AM2018-03-22T11:22:02+5:302018-03-22T11:24:01+5:30

मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत.

Crowds of Manpak; There is no 50 lakh rupees to fill the irrigation department | मनपाच्या तिजोरीत खडखडाट; पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपयेही नाहीत

मनपाच्या तिजोरीत खडखडाट; पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपयेही नाहीत

googlenewsNext
ठळक मुद्दे ऐन मार्च महिन्यात तिजोरीत खडखडाट असून, पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपये नाहीत. ६ कोटी रुपयांचा अत्यावश्यक खर्च समोर आहे. ११० कोटी रुपयांच्या विकासकामांची बिले प्रलंबित आहेत.

औरंगाबाद : मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ऐन मार्च महिन्यात तिजोरीत खडखडाट असून, पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपये नाहीत. ६ कोटी रुपयांचा अत्यावश्यक खर्च समोर आहे. ११० कोटी रुपयांच्या विकासकामांची बिले प्रलंबित आहेत, अशी विदारक स्थिती आज स्थायी समितीच्या सभागृहात प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी मांडली.

ओम प्रकाश बकोरिया यांनी आपल्या १४ महिन्यांच्या कार्यकाळात महापालिकेला कमालीची आर्थिक शिस्त लावली होती. पुढे ही शिस्त काही दिवसांमध्येच मोडण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी सुचविलेल्या कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. गरज नसताना कोट्यवधी रुपयांचे आऊटसोर्र्सिंग करण्यात आले. मार्चअखेरीस महापालिका डबघाईला निघाली आहे. महापालिकेचे खाते सध्या उणे २६ लाखांपर्यंत पोहोचले आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी नेहमीच्या पद्धतीने लेखाविभागावर तोंडसुख घेणे सुरू केले. वॉर्डातील विकासकामे ठप्प झाली आहेत. कंत्राटदारांची बिले त्वरित देण्यात यावीत. वसुली वाढविण्यात यावी, अशा सूचनांचा भडिमार सुरू केला. सभापती गजानन बारवाल यांनी प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांना खुलासा करण्याचे आदेश दिले.

पाटणी यांनी सादर केलेले आकडे पाहून अनेकांच्या पायाखालची वाळूच घसरली. शहराचा पाणीपुरवठा तोडू नये म्हणून आजच ५० लाख रुपये भरायचे आहेत. एवढीही रक्कम खात्यात नाही. ६ कोटींचा अत्यावश्यक खर्च समोर येऊन ठेपला आहे. यामध्ये डिझेल व इतर तत्सम बाबींचा समावेश आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये झालेल्या विकास कामांची मोठी बिले थकली आहेत. हा आकडा ११० कोटींचा आहे, अशा गंभीर परिस्थितीत काम कसे करावे, असा प्रश्न आहे. लेखा विभागाने सादर केलेल्या माहितीनंतर नगरसेवकांनी चक्क यू टर्न घेतला.

आर्थिक शिस्त लावावी कोणी
महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचे काम आयुक्तांनी करायला हवे. बकोरिया यांच्यानंतर कोणत्याही आयुक्तांनी अशी शिस्त लावण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे आज महापालिका भीषण आर्थिक संकटात सापडली आहे. दरमहिन्याला शासनाकडून १४ ते १९ कोटी रुपये जीएसटीपोटी मिळत आहेत. त्यावर कर्मचार्‍यांचा पगार, अत्यावश्यक खर्च होत आहे.

आर्थिक शिस्त बिघडली
महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार्‍या रकमेपेक्षा चारपट खर्च वाढवून ठेवण्यात आला आहे. गरज नसताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे वॉर्डांमध्ये करण्यात येत आहेत. अधिकार्‍यांना नाही, म्हणण्याची सवय नाही. नगरसेवकांनी अर्थसंकल्पात काम सुचविले म्हणून ते करण्याचा सपाटा अधिकार्‍यांनी लावला आहे.

८० कोटींची बिले अजून बाकी
मागील एक महिन्यापासून महापालिका आयुक्तांनी विविध विकासकामांच्या बिलांवर सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळे आयुक्तांसह विविध कार्यकारी अभियंत्यांकडे किमान ८० कोटींची बिले पडून आहेत. ३१ मार्चपूर्वी ही सर्व बिले लेखा विभागात कशी दाखल होतील, यादृष्टीने राजकीय मंडळींनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Crowds of Manpak; There is no 50 lakh rupees to fill the irrigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.