प्रशिक्षण दौऱ्यावरुन पालिकेत कोलाहल
By Admin | Published: June 28, 2014 11:42 PM2014-06-28T23:42:13+5:302014-06-29T00:37:05+5:30
लातूर : आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वतीने लातूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मनपा प्रशासन, नागरी सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यासह अन्य विषयांवर दोन दिवस प्रशिक्षण देणार आहे.
लातूर : आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वतीने लातूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मनपा प्रशासन, नागरी सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यासह अन्य विषयांवर दोन दिवस प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक नगरसेवकांना मनपाच्या नगर सचिव विभागाने पत्र दिले आहे. अभ्यासविषयक असलेल्या या प्रशिक्षणाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने ही राजकीय मने जुळविण्यासाठी सहल असल्याचा आरोप केला आहे.
शिर्डी येथील प्रशिक्षणात नगरसेवकांना ७४ वी घटना दुरुस्ती व बारावे परिशिष्टात नमूद कामे, महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कायदा, सभा शास्त्र, नागरीकरण व शहरांना भेडसावणाऱ्या समस्या, नागरी सेवा सुविधा वितरण व नागरी सेवा स्तर मूल्यांकन, आवश्यक नागरी सेवा सुविधा- पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते व पूल बांधणी, रस्त्यावरील दिवे इत्यादी सर्व सेवांचे व्यवस्थापन याविषयींचे प्रशिक्षण तज्ज्ञांमार्फत देण्यात येणार आहे. दोन दिवसीय प्रशिक्षणातून नगरसेवकांना मनपातील कायदे व सेवाविषयक कामांची माहिती मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना मनपाच्या नगर सचिव विभागाने अर्ज दिले आहेत. त्यानुसार २८ जूनपर्यंत सदरील अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी कितीजण इच्छुक आहेत, हे २८ रोजी समोर येणार आहे. (प्रतिनिधी)
ही तर राजकीय सहल : विरोधी पक्षाचा आरोप
मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. प्रशिक्षणासाठी शिर्डी येथे ७५ नगरसेवक व पाच अधिकारी अशा ८० जणांवर लाखो रुपये खर्च केले केले जाणार आहे. तिथे जाण्यापेक्षा तज्ज्ञांना लातुरातच बोलावून प्रशिक्षण दिल्यास मनपाची आर्थिक बचत होईल. मात्र सत्ताधाऱ्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांची मने जुळविण्यासाठी प्रशिक्षणाच्या नावावर ही राजकीय सहल आयोजित केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल माकणीकर यांनी केला आहे.
शिर्डी येथे आयोजित नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या जेवणाचा व राहण्याचा खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे. लातूर महानगरपालिकेकडून केवळ वाहतुकीचा खर्च केला जाणार आहे. अद्याप अपेक्षित खर्चाचा अंदाज आलेला नाही. इच्छुकांचे अर्ज आल्यावर त्यानुसार खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणावर फार मोठा खर्च येणार नाही. दोन दिवसांत खर्चाचा आकडा समोर येईल, असे मनपाचे नगर सचिव ओमप्रकाश मुतंगे यांनी सांगितले.