लॉकडाऊनमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:02 AM2021-03-28T04:02:12+5:302021-03-28T04:02:12+5:30

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल देण्यासाठी पेट्रोल पंप सुरू ठेवण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. ...

Crowds at petrol pumps in lockdown | लॉकडाऊनमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी

लॉकडाऊनमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी

googlenewsNext

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल देण्यासाठी पेट्रोल पंप सुरू ठेवण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, याचा गैरफायदा उचलत काही पंपावर शनिवारी जो येईल त्यास पेट्रोल देणे सुरू केल्याने वाहनधारकांनी पंपावर प्रचंड गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पंप बंद करण्यात आले. यावेळी पंपावरील कर्मचारी व वाहनधारकामध्ये शाब्दिक ठिणग्या उडाल्या.

लॉकडाऊन काळात पेट्रोलपंपवर अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश प्रशासनाने काढले होते. पेट्रोल पंप चालक संघटनांनी नियमावली सर्व पेट्रोल पंपांना पाठवली होती. अत्यावश्यक सेवा अर्थात रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर वाहिका, डॉक्टर, दवाखान्यातील कर्मचारी, पोलीस, शेती विषयक वाहतूक, प्रसार माध्यमे यांचे वाहन आल्यास त्यांच्याकडील ओळखपत्र बघून खात्री करूनच त्यांना पेट्रोल, डिझेल देण्यात यावे. वाहनधारकांनी व पंपावरील कर्मचाऱ्यांनी मास्क लावावा. मास्क लावलेल्या वाहनधारकालाच पेट्रोल, डिझेल देण्यात यावे, असे स्पष्ट आदेश होते.

शनिवारी सकाळी शहरतील जालना रोड, जळगाव रोड, स्टेशनरोड, बीडबायपास रोडवरील काही पेट्रोल पंप सुरू झाले. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी जो वाहनधारक येईल त्यास पेट्रोल देणे सुरू केले. मास्क लावल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही, असे फलक लावण्यात आले होते; पण प्रत्यक्षात याकडे कोणी लक्ष देत नव्हते. पंपावर पेट्रोल मिळत असल्याने व रस्त्यावर पोलीस अडवत नसल्याने लॉकडाऊन असतानाही हजारो दुचाकीधारक पंपावर आले. सकाळी ९ वाजेपासून पंपाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. क्रांतीचौक, जालना रोड, गारखेडा परिसर, बीडबायपास रोडवरील काही पेट्रोल पंपावर दुपारी १२ वाजेपर्यंत एवढी गर्दी उसळली की, वादावादी सुरू झाल्या. राज पेट्रोल पंपावर पोलीस बोलविण्यात आले. गारखेड्यातील पेट्रोलपंपाच्या बाहेर रस्त्यावर दुचाकीस्वार उभे होते, त्यामुळे रस्ता जाम झाला होता. बीडबायपासवरील म्हस्के पेट्रोल पंपवर बाहेरच वाहनधारकांना अडविण्यात येत होते व मोजक्याच वाहनधारकांना पंपावर पाठविण्यात येत होते.

क्रांती चौकातील पंपावर एवढी गर्दी उसळली की, येथे येऊन पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. कारवाईच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी पेट्रोल संपले असे सांगून पेट्रोल विक्री बंद केली. तुम्ही आधी शेकडो लोकांना पेट्रोल दिले मग आम्हाला का नाही असे म्हणत वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.

चौकट

जबाबदार कोण

लॉकडाऊन असताना पेट्रोल खरेदीसाठी बाहेर पडलेले वाहनधारक पंपावरील गर्दीला कारणीभूत आहे की, प्रशासनाचे आदेशाला डावलून सर्वांना पेट्रोल देणारे पेट्रोल पंपचालक असा प्रश्न आता विचारला जात आहे. बेजबाबदार पेट्रोलपंपचालकांवर कारवाई करण्यात यावी व सीसीटीव्ही फुटेज बघून पंपावर दिसणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Crowds at petrol pumps in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.